
सामना प्रतिनिधी, मुंबई
टीईटी, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे तसेच शिक्षण विभागाच्या ‘पवित्र’ संगणक प्रणालीवर नोंद असलेल्या उमेदवाराचीच मेरिटनुसार शिक्षक भरतीसाठी वर्णी लागणार आहे. शाळांनाही आपल्याकडील शिक्षकांच्या रिक्त जागांचा तपशील ‘पवित्र’वर जाहीर करायचा असून मुलाखत घेऊनच उमेदवारांची शिक्षकपदी नेमणूक करायची आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जाहीर झाला. या ऑनलाइन शिक्षकभरतीत कर्नाटक सीमा भागातील 865 गावांतील अर्हताप्राप्त उमेदवारांनाही संधी मिळणार आहे. मात्र या उमेदवारांना इतर उमेदवारांप्रमाणे आरक्षणाच्या सवलती मिळणार नाहीत.
पवित्र संगणक प्रणालीवर शाळा व्यवस्थापकांनी रिक्त जागांचा तपशील सादर केल्यानंतर पालिका शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक कार्यालयाद्वारे पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. सदर जाहिरात पाहून आलेल्या उमेदवारांची गुणवत्ता तपासून मुलाखतीद्वारेच शिक्षक पदावर नियुक्ती करायची आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत यशस्वी होण्यासाठी उमेदवारांना पाच संधी दिल्या जातील. पाचही संधी संपल्यास उमेदवाराला पुन्हा नव्याने परीक्षा देण्याची संधी आहे. उमेदवाराचे वय निघून गेल्यास तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्रे अपात्र असल्यास या चाचणी परीक्षेची अर्हताही संपणार आहे.
भरती प्रक्रिया पवित्र संगणक प्रणालीद्वारे न करणाऱया शिक्षण संस्थांना रिक्त पदांचे वेतन किंवा वेतनेतर अनुदान मिळणार नाही. स्वयंअर्थसहाय्यित, अल्पसंख्याक, इंग्रजी कायम विनाअनुदानित शाळा या भरती प्रक्रियेतून वगळण्यात आल्या आहेत. त्यांना हा शासन अध्यादेश लागू नाही.
अशी असेल अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.
सदर परीक्षा वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
उमेदवाराला गुण सुधारण्यासाठी गुण सुधारण्यासाठी पाच संधी मिळतील.
परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी, उर्दू असेल.
200 गुणांची परीक्षा होईल. यात अभियोग्यता चाचणी 120 गुण तर बुद्धिमत्ता चाचणी 80 गुणांची असेल.

























































