
यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबतच्या सुधारित सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. शाळेत येणाऱया 12 वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यावर भर द्या, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांनाही बूस्टर डोस घेणे आवश्यक असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शिक्षण विभागाच्या सुधारित आदेशानुसार 13 जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून 15 जूनपासून प्रत्यक्ष वर्ग भरणार आहेत. शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांनी 13 आणि 14 जूनला शाळेत उपस्थित राहून शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण करणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने सूचित केले आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण, आरोग्य विभाग तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शाळांनी हे करावे
- ताप किंवा इतर कोरोनासदृश लक्षणे असलेल्या विद्यार्थ्याला शाळेत न पाठविण्याच्या सूचना पालकांना द्याव्यात.
- विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्याचे तातडीने विलगीकरण करावे.
- तसेच तत्काळ रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर चाचणी करावी.
- शाळेत येणाऱया विद्यार्थी, पालकांचे कोरोना प्रतिबंधक उद्बोधन करावे.

























































