खासगी लसीकरणाचे महारॅकेट; खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; एक डॉक्टर फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी वर्सोवापाठोपाठ खार पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. टिप्स कंपनीच्या वतीने जूनच्या पहिल्या आठवडय़ात 206 जणांचे लसीकरण झाले होते. लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी खार पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे टिप्स कंपनीत कामाला आहेत. जून महिन्यात टिप्स कंपनीच्या कर्मचाऱयांना आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी लसीकरण कॅम्प आयोजित केला होता. फसवणूक करणाऱया चौघांनी आपण अंधेरीच्या एका खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरण कॅम्प आयोजित करत असल्याच्या भूलथापा मारल्या होत्या. त्यानुसार 3 जूनला खार येथील टिप्स कंपनीत लसीकरण कॅम्प आयोजित केला होता. त्या कॅम्पमध्ये 206 जणांना लस देण्यात आली होती. लसीकरणाच्या मोबदल्यात 2 लाख 84 हजार 696 रुपये घेण्यात आले होते. लसीच्या नावाखाली भेसळयुक्त द्रवपदार्थ देऊन फसवणूक केल्याने टिप्स कंपनीच्या वतीने आज खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेऊन सायंकाळी खार पोलिसांनी गुन्हा केला आहे. नुकताच वर्सोवा पोलिसांनीदेखील चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फरार डॉक्टरचा शोध सुरू

लसीकरण घोटाळ्याचा सूत्रधार हा डॉक्टर असून कांदिवली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जोपर्यंत डॉक्टर पोलिसांच्या हाती लागत नाही तोपर्यंत काही गोष्टींचा उलगडा होणार नाही. या टोळीने मुंबई-ठाण्यात अशा नऊ ठिकाणी लसीकरण कॅम्प घेतले होते. त्या कॅम्पला नेण्यात आलेल्या लसीच्या कुप्यांची झाकणे अगोदरच उघडलेली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर फरार डॉक्टर हा पॅरामेडिकल इन्स्टिटय़ूट चालवत असून त्या इन्स्टिटय़ूटमधील शिकाऊ विद्यार्थ्यांना लस टोचण्यासाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पुरावे नष्ट केले

लसीकरण घोटाळय़ातील एक आरोपीने पुरावा नष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपीने त्याचा मोबाईल नवी मुंबई परिसरात फेकून दिल्याचे समजते. पोलीस जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर भर देत आहेत.