
झायडस कॅडिला कंपनीची तीन डोसवाली ‘जायकोव्ह-डी’ लस याच महिन्यात राष्ट्रीय कोरोना लसीकरण मोहिमेत समाविष्ट केली जाणार आहे. केंद्र सरकारने लस उत्पादक कंपनीकडे एक कोटीहून अधिक डोसची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे लवकरच देशभरात 12 वर्षांपुढील मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकणार आहे. ‘जायकोव्ह-डी’ ही स्वदेशी बनावटीची जगातील पहिली डीएनए आधारित कोरोना लस आहे. सुरुवातीला प्रौढ नागरिकांना या लसीचे डोस दिले जाण्याची शक्यता आहे.
‘जायकोव्ह-डी’ लस अहमदाबादच्या झायडस कॅडिला कंपनीने विकसित केली आहे. या स्वदेशी लसीचा राष्ट्रीय कोरोना लसीकरण मोहिमेत समावेश करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. देशाच्या औषध नियामकने 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी मंजुरी दिलेली ही पहिली लस आहे. केंद्र सरकारने या लसीच्या एक कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. मर्यादित उत्पादन क्षमतेमुळे सुरुवातीला ही लस प्रौढांना दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱयांनी दिली आहे.
z झायकोव्ह-डी लसीच्या एका डोसची किंमत साधारण 358 रुपये असून यात कराचा समावेश नाही. मात्र डिस्पोजेबल पेनलेस जेट ऑप्लिकेटरची किंमत समाविष्ट आहे.
z झायडस कॅडिला कंपनीने सरकारला दर महिन्याला झायकोव्ह-डी लसीचे एक कोटी डोस देण्याची तयारी दाखवली आहे.
z ही लस देण्यासाठी लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱयांना जेट ऑप्लिकेटर वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कारण ही लस सुईने टोचली जात नाही.
z झायकोव्ह-डी लसीचे तीन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातील. प्रत्येक डोस दोन्ही हातांवर दिला जाईल.

























































