वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या डायलिसिस सेवेचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

वैद्यकीय क्षेत्रात महागड्या असणाऱ्या डायलिसिस सुविधा आता परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत देण्यात येणार असून या श्री वैजनाथ डायलिसिस सेंटरचा मान्यवरांच्या हस्ते थाटात शुभारंभ संपन्न झाला. डॉ.सूर्यकांत मुंढे यांच्या हॉस्पिटलमध्ये ही डायलिसीस सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेले, सर्पदंश किंवा तत्सम विषबाधा झालेल्या रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. या सेवेबद्दल श्री वैद्यनाथ देवल कमिटीचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. परळीत उपलब्ध करून देण्यात आलेली मशीन ही पहिली एकमेव जर्मन टेक्नॉलॉजीची फ्रेशेनीअस मेडिकल केअरची मशीन आहे.

शुक्रवार रोजी मुंडे बाल रुग्णालयाच्या प्रांगणात हा डायलिसिस सेंटरचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रभू वैद्यनाथ आणि भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे,स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, सहआयुक्त बीड एस.व्ही.एच.कादरी, एम.एल.जोगी, एस.जे.बोन्द्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, तहसीलदार तथा वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष शरद झाडके, सचिव राजेश देशमुख, डॉ.सूर्यकांत मुंढे,डॉ.मधुसूदन काळे, डॉ.सतीश गुठे, डॉ.गुरुप्रसाद देशपांडे, विश्वस्त बाबुराव मेनकुदळे,प्रदीप देशमुख, प्रा.बाबासाहेब देशमुख,अनिल तांदळे, नंदकिशोर जाजू,पुजारी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना शिवकुमार डिघे (धर्मादाय आयुक्त,महाराष्ट्र) म्हणाले की, राज्यात 430 धर्मादाय रुग्णालय आहेत. आम्ही त्यांच्या नावात धर्मादाय रुग्णालय लावणे बंधनकारक केल्याने त्याची माहिती जनसामान्यांना होऊ लागली आहे व गरीब रुग्ण तेथे उपचार घेत आहेत. राज्यात आम्ही प्रत्येक जिल्ह्यात सामुदायिक विवाह सोहळा करण्याचे ठरवले आणि 3000 पेक्षा जास्त विवाह संपन्न झाले. राज्यातील रुग्णांना आरोग्य सुविधा तर आम्ही देतो, पण डायलिसिस अभावी अनेक रुग्णांची हेळसांड होते आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही परळीत मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

डॉ. सुधीर देशमुख (अधिष्ठाता, एस.आर.टी. रुग्णालय) यावेळी म्हणाले की, डायलिसिस ही प्रक्रिया ही किडनीचे काम शरीराच्या बाहेर करण्याचं मशीन आहे. एखाद्या रुग्णाच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्या असतील तर त्याला किडनी प्रत्यारोपण किंवा आयुष्यभर डायलिसिसची आवश्यकता असते. डायलिसिसचा फायदा रुग्णांना होईलच परंतु आपण निरोगीच असले पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन डॉ. सुधीर देशमुख यांनी केले.

परळीत वैद्यनाथ देवस्थान कमिटीकडून सुरू करण्यात आलेल्या डायलिसिसच्या सुविधेमुळे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व जिल्हा रुग्णालयावरचा भार कमी होणार आहे. -डॉ.अशोक थोरात (जिल्हा शल्यचिकित्सक)

राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार दिघे यांनीच या उपक्रमाला प्रेरणा देऊन खूप मोठी मदत केली आहे. काही दिवसांपूर्वी खूप मोठा सामुदायिक सर्वधर्मीय विवाह सोहळा त्यांच्याच पुढाकाराने संपन्न झाला आणि यात 99 जोडप्यांचा संसार उभा राहिला. संबंध राज्य या भव्य आणि नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार आहे. दिघे साहेबांनी राज्यभर ही चळवळ राबवल्याने राज्यातील 3000 हजार लग्न पार पडली आहेत. -राजेश देशमुख (सचिव,वैद्यनाथ देवल कमिटी)