Vaishnavi Hagawane Case – नेपाळ सीमेवर नीलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील सहआरोपी नीलेश चव्हाण याच्या नेपाळ सीमेवरून मुसक्या आवळण्यात पिंपरी – चिंचवड पोलिसांना अखेर यश आले. नीलेश चव्हाण याचा पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर पुण्याहून रायगड, दिल्ली, गोरखपूर आणि तिथून त्याने नेपाळ गाठला असल्याची माहिती पुढे आली आहे. नीलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली होती. तरीही तो हाती लागत नसल्याने त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयाकडून ‘स्टॅण्डिंग वॉरंट’ही जारी करण्यात आले. अखेर, शुक्रवारी त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. विमानाने त्याला मध्यरात्री पुण्यात आणण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वैष्णवी हगवणे मृत्युप्रकरणात नीलेश चव्हाण याला सहआरोपी करण्यात आले आहे. मात्र त्याच्यावर गुन्हे दाखल झाल्यापासून तो पसार होता. गेल्या सात दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची सहा पथके, तर पुणे पोलिसांची तीन पथके त्याच्या मागावर होती. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला. पुणे, मुंबई, कोकणासह कर्नाटक, गोव्यातही तपास केला जात होता. त्याच्या संपका&तील मित्र, नातेवाईक यांच्याकडेही कसून चौकशी केली जात होती. प्रामुख्याने गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट चार आणि सायबर सेलचे पोलीस अधिकारी, कर्मचारी शोध घेत होते. नीलेश चव्हाण हा नेपाळ-हिंदुस्थान सीमेवरून सहा ते सात किलोमीटर आत असल्याची माहिती मिळाली होती. सायबर पोलिसांच्या मदतीने पोलीस तिथपर्यंत पोहोचले आणि त्याच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली.