नववर्षाच्या स्वागतावेळी भयंकर दुर्घटना; माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; 12 भाविकांचा मृत्यू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात भयंकर दुर्घटना घडली. मध्यरात्री 2.30 ते 2.45 च्या दरम्यान दर्शनरांगेत प्रचंड चेंगराचेंगरी होऊन  किमान 12 भाविकांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी आहेत. मंदिर प्रशासनाचे गैरव्यवस्थापन आणि गलथान कारभारामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, भाविकांच्या दोन गटांत झालेली वादावादी आणि हाणामारिमुळे चेंगराचेंगरी झाल्याचे माता वैष्णोदेवी बोर्डाने म्हटले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह, पोलीस महानिरीक्षक दिलबाग सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी भाविकांची विचारपूस केली.

दोन लाखांची मदत आणि उच्चस्तरीय चौकशी

मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची भरपाई आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली असून पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवरून माहिती दिली आहे.

जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रधान सचिव शालिन काबरा, जम्मूचे विभागीय आयुक्त राजीव लंगार आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांची समिती दुर्घटनेची चौकशी करेल.

दुर्घटना कशी घडली?

माता वैष्णोदेवी हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. जम्मूपासून कटरा 43 किलोमीटर आणि तेथून 13 किलोमीटर डोंगरावर माता वैष्णोदेवीचे मंदिर आहे.

देशभरातून आणि विदेशातून लाखो भाविक दरवर्षी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येथे येतात. कटरा बेसपॅम्प ते माता वैष्णोदेवी मंदिरापर्यंत डोंगर ट्रेपिंग करून भाविक पोहोचतात.

31 डिसेंबरला किमान 35 ते 40 हजारांवर भाविक नववर्षाच्या दर्शनासाठी कटरा पॅम्प आणि परिसरात होते. मध्यरात्री 12 वाजता भाविकांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली.

मंदिराकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. मध्यरात्री 2.30 ते 2.45 वाजता गेट क्रमांक तीनसमोर प्रचंड गर्दी उसळली. काहीतरी अफवा, धक्काबुक्की, भांडण झाले आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली असावी असा अंदाज आहे.

चेंगराचेंगरी एवढी भयंकर होती की त्यात अनेकांचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अनेकांच्या हाता-पायांना मोठी इजा झाली. चेंगराचेंगरीनंतर भाविकांमध्ये आक्रोश पसरला.

चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला. यातील सातजण उत्तर प्रदेशातील, तिघे दिल्लीतील, हरयाणा आणि जम्मू-कश्मीरातील प्रत्येकी एक भाविक आहे. 15 जखमींवर माता वैष्णोदेवी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून  दोघांची प्रपृती गंभीर आहे.

प्रत्यक्षदर्शींचा आक्रोश, संताप…30 ते 40 भाविकांच्या मृत्यूचा दावा

प्रशासनाच्या गलथान व्यवस्थापनामुळे चेंगराचेंगरी झाली असा संताप व्यक्त करीत प्रत्यक्षदर्शी भाविकांनी आक्रोश केला. अक्षरशः बॉम्बस्पह्ट झाल्यासारखी भयंकर परिस्थिती होती. सरकारी आकडा 12 असला तरी 30 ते 40 भाविकांचा मृत्यू झाला असा दावा रश्मी बसेटिया यांनी केला आहे. त्या दिल्लीतील शिक्षिका असून तीन मैत्रिणींसोबत आल्या होत्या. चेंगराचेंगरीनंतर त्यांच्या मैत्रिणींचा ठावठिकाणा लागलेला नाही.

आम्ही व्हीव्हीआयपी गेट क्रमांक 5 जवळ रात्री बारा वाजता होतो. तेव्हाच लोक एकमेकांना ढकलत होते. सुरक्षारक्षक केवळ उभे होते. गर्दीवर कोणीही नियंत्रण ठेवत नव्हते. मध्यरात्री 12 नंतरच गेट क्रमांक तीन, पाच येथे मृत्यूचे सत्र सुरू झाले. अनेकांचे हात-पाय तुटले. अनेकांना चिरडले  गेले हे सांगताना रश्मी बसेटिया यांना रडू कोसळले.

प्रशासन, पोलीस, सुरक्षारक्षक यांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या नाहीत. हजारो भाविक कोविड नियमांचे पालन करत नव्हते. कोणाच्या तोंडावर मास्क नव्हते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.