
कोरोना महामारीमुळे माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला मुकलेल्या देशातील भाविकांना आता मातेचा प्रसाद पोस्टाने थेट घरपोच पाठवण्याचा निर्णय माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाने घेतला आहे. भक्तांनी मागणी केल्यास देशातील सर्वच भागात देवीचा प्रसाद त्यांना घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी श्राईन बोर्डाने हिंदुस्थानी पोस्ट खात्याशी सामंजस्य करार केला आहे.
वैष्णोदेवी यात्रा मात्र कोरोनामुळे यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो देवी भक्तांना मातेचे दर्शन आणि प्रसादापासून वंचित राहावे लागले आहे. भाविकांची ही अडचण सोडवण्यासाठी माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाच्या मदतीला हिंदुस्थानी पोस्ट खाते धावले आहे. आता भाविकांच्या मागणीनुसार मंदिराचा प्रसाद वेगाने घरपोच करण्याची जबाबदारी पोस्टाने घेतली आहे. या प्रसादाच्या मागणीसाठी भाविकांना कटरा येथील वैष्णोदेवी देवस्थान मुख्यालयात 9906019475 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा लागणार आहे.
























































