
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुटकेसाठी याचिका दाखल करणाऱ्या वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जाला राज्य सरकारने आज जोरदार विरोध केला. देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हाच असून त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावावा अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात करण्यात आली.
बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडप्रकरणी वाल्मीक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जामिनासाठी त्याने हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी वाल्मीकच्या वतीने युक्तिवाद करताना वकिलांनी सांगितले की, मोक्का कायदा चुकीच्या पद्धतीने लावला गेला आहे आणि देशमुख हत्याकांडात कराडचा संबंध नसून तो घटनेच्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर होता. त्याला प्रकरणात गोवण्यात आले आहे. त्यावर सरकारी वकील ऍड. अमरजितसिंह गिरासे यांनी घटनाक्रम तपशीलवार सांगतानाच या घटनेतील साक्षीदार, मोबाईल फोन संवादाच्या तपशिलाचा (सीडीआर) अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, ध्वनिफीत मुद्रण, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.
सरकारचा युक्तिवाद काय
वाल्मीक याने अवादा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, सुदर्शन घुलेने देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणानंतर कराड याने आपल्या मागणीच्या आड येणाऱया देशमुखला आडवा करा, असा आदेश दिला. त्यानुसार सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱयांनी उमरी टोलनाक्यावरून संतोष देशमुख यांचे अपहरण केले व त्यांना निर्जन जागी नेऊन त्यांची हत्या केली. मारहाण सुरू असताना वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर बोलणे सुरू होते. कराड हाच मारेकऱयांना निर्देश देत होता, असे सरकारी वकील गिरासे यांनी न्यायालयाला सांगितले.































































