
>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
[email protected]
कवयित्री आणि गीतकार अशी असणाऱ्या शांताबाई शेळके खऱ्या अर्थानं मोकळ्या होतात आणि फुलून येतात ते या ललित गद्य लेखनात. त्यांचं शब्दांवर असणारं प्रेम अनेक तऱ्हांनी प्रकटलं आहे.
‘प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा’ असं अगदी आत्मविश्वासानं लिहिणाऱ्या शांताबाईंसारखं – शांता शेळके – साहित्यावर मनपूर्वक प्रेम करणारं व्यक्तिमत्त्व विरळा. त्यांचं शब्दांवर असणारं प्रेम किती तऱ्हांनी प्रकटलं आहे. शब्दांशी अगदी न कळत्या वयात त्यांचं नातं जुळलं आणि त्या शब्दांच्याच होऊन गेल्या. शब्दांवेगळं अस्तित्वच नव्हतं जणू त्यांना.
कवयित्री आणि गीतकार अशी मुख्य ओळख असणाऱया शांताबाईंनी अगदी सुरुवातीपासून म्हणजे 1944 पासून कथा लिहिल्या. शिवाय ‘ओढ’, ‘धर्म’, ‘मायेचा पाझर’सारख्या 8-9 कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. ललित लेखन, सदर लेखन यांची 40 च्या वर पुस्तकं आहेत. कितीतरी अनुवाद आहेत. बालसाहित्य आहे. चित्रपट गीत संग्रह, कवितासंग्रह तर आहेतच, शिवाय संपादनही! विनोद आणि नाटक वगळता त्यांनी अगदी मुक्त संचार केला साहित्य विश्वात.
त्या खऱया अर्थानं मोकळ्या होतात आणि फुलून येतात ते या ललित गद्य लेखनात. रोजच्या जगण्यातले अनेक अनुभव, व्यक्ती आणि विचार ही त्यांच्या ललित गद्याची प्रेरणा आहे. निसर्गवर्णन, व्यक्तिचित्र, प्रवासलेख, स्मृतिलेख, पत्र, परीक्षण, आस्वाद असं सर्व प्रकारचं लेखन त्यांनी केलं आहे. सिनेमा म्हणू नका, चित्रे म्हणू नका की विविध कलावंतांची चरित्रे म्हणू नका. शांताबाईंच्या नजरेत सारे येत होते आणि स्मृती संपुटात साठवले जात होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात खमंग खाण्याचे, गोड गाण्यांचे उल्लेख जसे अगदी स्वाभाविक वाटतात. तसेच कालिदास-भवभूतीचेही. कधी नॉर्वेजियन नटी लिव उलमनचं आत्मचरित्र त्या आपल्या समोर उलगडतात, तर कधी लॉरेन्स ओलिव्हिए या प्रख्यात अभिनेत्याचे उद्गार कसे नवीच प्रतीती देतात याविषयी लिहितात. कधी चिनी म्हणीचा उल्लेख करून ‘सहावे सुख’ याविषयी चिंतन करतात. त्यांना बोलण्याची जी हौस होती ती या लेखनाला बोलकं आणि ओघवतं आणि प्रवाही बनवते. वचने, सुभाषिते, कवितेच्या ओळी, प्राचीन ते अत्याधुनिक साहित्यातले दाखले त्यांचा विषय उजळत राहतात. वृत्तीची उत्कटता आणि शैलीची काव्यात्मता त्यांचे लेखन रसरशीत बनवते.
त्यांच्या प्रचंड वाचनातले अगणित संदर्भ, कवितेच्या ओळी, किस्से त्यांना नेमके आठवतात आणि त्यांच्या लेखनात सहजपणे जागा पटकावतात. या सहजतेमुळे पढिक पांडित्याचा गर्विष्ठ दर्प त्याला येत नाही. जुन्या-नव्या साहित्याच्या वाचनावर पोसलेली त्यांची मराठी फार वेल्हाळ आहे. क्वचितच कधी तिच्यात इंग्रजी शब्द येतो.
शब्द, त्यांचा नाद, त्यांची पुनरुक्ती, त्यातून उठणारी उच्चारांची मजेशीर वलये याचं त्यांना लहानपणीच वेड लागलं होतं आणि शाळकरी वयात लागलेलं हे कवितेचं वेड वाढत गेलं. शांताबाईची कविता भावगंभीर गाभ्याची कविता आहे. ‘दिवसगतीने फिकाच पडतो, रंग सुखाच्या गडद क्षणांचा’ ही जीवनाची उमज तिच्यात आहे. जगताना आलेला सगळा शिणवटा, उदासीनता ‘अर्घ्य धरावे आणि अर्पावे’ तसा ओंजळीत धरला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणूनच कदाचित त्यांच्या कवितेत जीवनातला अटळ एकाकीपणा आणि शीण, दुःख आणि शल्ये प्रकटूनही कडवटपणा किंवा संताप दिसत नाही. त्यांचा जीवनावरचा लोभ उणावलेला दिसत नाही. अनाम भीती, आधारासाठी पार्थिवावर विसंबून राहण्याऐवजी निराकार तत्त्वाकडे वळणं हेही पुन पुन्हा दिसते तिच्यात.
गूढता, सूचकता, अल्पाक्षरत्व आणि संपूर्ण व्यक्तिगत अनुभवांमुळे येणारी पृथगात्मता हे कवितेसाठी आवश्यक असणारे गुण गीत रचनेला मात्र बाधक ठरतात. सोपेपणा, सहजता, ऐकता क्षणी मनात अर्थ उलगडत जाईल अशी शब्दकळा ही गीताची गरज असते. हे जाणून घेऊन शांताबाईंनी आकाशवाणी, चित्रपट आणि ध्वनिमुद्रिका या सर्व माध्यमांसाठी विपुल गीतरचना केली. उत्कट आणि अत्यंत संवेदनशील मनावर उमटलेले अनुभूतीचे खोल ठसे त्यांच्या लेखनात उमटले आहेत. भावपरता हा शांताबाईंच्या पिंडाचा भाग होता. म्हणूनच त्यांच्या समीक्षापर लेखनातही वस्तुनिष्ठेपेक्षा जिव्हाळा अधिक आहे. समीक्षेच्या तात्त्विक बैठकीपेक्षा आस्वाद घेण्याकडे आणि शिक्षकी पेशा असल्यामुळे समजून देण्याकडे त्यांचा कल आहे.
‘गीतकार शांताबाई’ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय रूप आहे हे खरे असले तरी त्यापलीकडे खूप लेखन त्यांनी केलं आहे. तेही नजरेखालून जायला हवे.
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)




























































