सृजन संवाद – दृष्टिकोन बदलणं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वंदना ताम्हाणे

काय असतं दृष्टिकोन बदलणं? मुळात दृष्टी म्हणजे काय? दृष्टी म्हणजे नजर असा साधा अर्थ. डोळ्यांनी आपण पाहतो, पण त्या वस्तूच्या आकारमानापर्यंत आपण पाहतो ते दिसणं झालं. त्यापलीकडेही त्या वस्तूचं अस्तित्व असतं, त्याचा अर्थ असतो ही त्यामागची नजर झाली. ही नजर येते कुठून? आत्मपरीक्षणातून. योग्य विचारांती ऊहापोह करून बदललेल्या दृष्टिकोनातून आयुष्य किती सुंदर आहे याची जाणीव होते आणि जगणं सुंदर होतं. प्रत्येक श्वास मुक्त होतो. ‘बंधन’ हा शब्द जणू मुक्ततेने कधी ऐकलाच नाही.

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते

संत तुकोबारायांच्या गाथेतील हा अभंग खरं तर जीवनगाथाच. इंद्रायणीच्या पाण्यावर गाथा तरली ती सामान्य जनांच्या उद्धारासाठीच. किती सत्यता आहे या अभंगात! समग्र संतसाहित्यच लोककल्याण व जीवनाधिष्ठित. मानवाचा जन्म या पृथ्वीतलावर झाला तो नेमका कशासाठी याचा जो तो आजपर्यंत शोध घेत आहे. कुणी अध्यात्मातून, विज्ञानातून, तत्त्वज्ञानातून, अनेक दृष्टिकोनांतून. ‘मानव’ या शब्दातच ‘मन’ हा शब्द दडलेला. मन ही न दिसणारी अदृश्य गोष्ट, परंतु मानव शरीरात संपूर्ण व्यापलेली, अथांग. मानव आणि मन वेगळं करता येणार नाही. विचार आणि भावनांचा गुंता व षड्रिपूंचं याला चंदेरी वेष्टन. अंतर्मन व बाह्यमन यांचं द्वंद्व सतत सुरू. मानवाच्या तळामुळाशी मन. या मन नावाच्या मुळापासूनच सुखदु:खाच्या फांद्या फुटलेल्या. अनेक विकारांची फळं लगडलेली मनाच्या या वृक्षाला, पण ही विषारी किंवा अमृत ते खाणाऱयाच्या चवीवर, रसनास्वादावर अवलंबून. अशा या मनाला आकळणं खरंच शक्य आहे का? मन असं सहज आपोआप प्रसन्न होण्यासारखं आहे का? इतकं सहजसाध्य आहे का ? तर नाही. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, “मन करा रे प्रसन्न”. ‘करा रे’ असं यात अभिप्रेत… गर्भितार्थ. मन असं सहज प्रसन्न होणार नाही. त्याला प्रसन्न करायला आपल्यालाच उपाय करावे लागतील.

मन चंचल लाडाचं लेकरू

देवा त्याला कसं मी सावरू

 मनाला प्रसन्न करा म्हणजे काय नेमकं? शरीराला जसं वळण हवं तसंच मनालाही वळण हवं. संस्कार शिदोरीनेच हे शक्य आहे. मनावर संस्कार केले तरच ते सकस व प्रसन्न राहू शकतं. तेही सवयीने. मन भरकटणं तर नित्याचेच. त्याला वळून आणावं लागतं. इच्छा, आकांक्षांचं अतोनात ओझं मनावर. सुखाच्या मागे मागे धावणारी. जरा काही मनाविरुद्ध झालं की आकांडतांडव, दु:खाचा डोंगर. मनाने समाधानी राहणं हीच गुरुकिल्ली मनाच्या प्रसन्नतेची. सुख हे मानण्यावर. ज्या दृष्टीने आपण एखाद्या गोष्टीकडे पाहू तो दृष्टिकोन ठरवतो सुखदु:खाची व्याख्या. संत जे बोलले तेच अभंग झाले. उठता बसता त्यांच्या तोंडची अमृताक्षरे अभंग झाली. संत तुकारामांनी संसारात राहून मनाला प्रसन्न करून नि:संग भावनेने प्रपंचात राहून, परंतु त्यात न अडकता भक्ती कशी करावी, याची शिकवणच दिली. सहजधर्म, सहजकर्म. कमलपत्रावर पाण्याचा थेंब जसा त्यावर असूनही पानावर लिप्त होत नाही. संग असूनही नि:संग राहणं मनाचं. अशा या मनाच्या कळसाचं दर्शन रोज घडावं.