
बंगळूरूवरुन वाराणसीला जाणाऱ्या विमानात एक विचित्र घटना घडली. विमान लॅंडिंग दरम्यान एका प्रवाशाने आपत्कालीन गेट उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वच प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. वाराणसी विमानतळावरील धावपट्टीवर विमान उतरणार असताना प्रवाशाने हे कृत्य केले. प्रवाशाच्या या कृतीमुळे विमानातील प्रवाशांचे प्राण धोक्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान जमिनीपासून केवळ ५०० फूट उंचीवर उतरण्याच्या स्थितीत होते. दरम्यान, आपत्कालीन गेट उघडण्याच्या प्रयत्नाची माहिती मिळताच पायलटने तात्काळ विमान हवेत उचलले. त्यानंतर, वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाल्यावर केबिन क्रू आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
सुरक्षा नियमांनुसार, आरोपी प्रवाशाला तात्काळ एअरलाइन सुरक्षा कर्मचारी आणि सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट 6E-185 ने शनिवारी रात्री सुमारे ८:१५ वाजता बंगळूरुहून उड्डाण केले. दक्षिण टोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा मोहम्मद अदनान नावाचा एक तरुण विमानात होता. उड्डाणानंतर अवघ्या १५ मिनिटांतच त्याने पहिल्यांदा आपत्कालीन दरवाजाशी छेडछाड केली, परंतु विमान कर्मचाऱ्यांनी त्याला शांत केले. त्यानंतर तो आपल्या जागेवर आरामात बसून राहिला. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा विमान वाराणसी विमानतळावर उतरणार होते आणि केबिन क्रूने त्याला याची माहिती दिली, तेव्हा रात्री सुमारे १०:२० वाजता अदनानने पुन्हा आपत्कालीन दरवाजाचे बटण दाबण्याचा प्रयत्न केला. क्रूने तात्काळ या घटनेची माहिती दिली आणि पायलटने सावधगिरीने विमान पुन्हा हवेत नेले. रात्री १०:३५ वाजता झालेल्या दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरले.
विमानतळ सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की त्याने असे का केले हे त्याला माहीत नाही. त्याच्यावर भूत संचारले होते, असे तो म्हणाला. तथापि, पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, त्याने नंतर सांगितले की तो गोव्याच्या सहलीवर गेला होता आणि तेथून परत येत होता. त्याने नंतर असेही सांगितले की, बटण दाबून विमानाचा दरवाजा उघडू शकतो याची त्याला कल्पना नव्हती. पोलीस सध्या तपास करत आहेत.
इंडिगोचे सुरक्षा व्यवस्थापक, देवांशू प्रताप सिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. अदनानच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. कुटुंबीय वाराणसीसाठी रवाना झाले असून, त्यांच्या आगमनानंतर अधिक सविस्तर माहिती मिळेल. सध्या, पोलीस तसेच इतर सुरक्षा यंत्रणांचे पथक अधिक चौकशी करत आहे.



























































