वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक तरुणीला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी सवा सातच्या सुमाराला हिंगणघाट येथील नंदोरी मार्गावर ही घटना घडली. या घटनेत पीडिता गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेतील आरोपीचे नाव विकी नगराळे असं असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
दारोडा येथील रहिवासी असलेला विकी हा विवाहित असून त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पीडितेवर त्याचं एकतर्फी प्रेम होतं, अशी माहिती मिळत आहे. सोमवारी सकाळी विकी आपल्या दुचाकीवरून नंदोरी मार्गावर येऊन थांबला होता. पीडिता बसने नंदोरी चौकात आली आणि तिथे उतरून आपल्या कॉलेजच्या दिशेने निघाली. तेव्हा विकीने तिला वाटेत अडवून तिच्यावर बाईकमधील पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले. पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर तो तिथून पळून गेला.
पीडितेला जळताना पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली आणि तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली. पीडितेचा चेहरा, छाती आणि हाताला भाजल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. तिला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार व अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आरोपी विकी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

































































