प्रवाशांना गावरान मेजवानी! प्रवासात घेता येणार साबुदाणा खिचडी, बेसन पोळा, सावजी चिकनचा आस्वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर (शिर्डी) आणि सोलापूरदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना गावरान मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. साडेपाच-सहा तासांच्या या आरामदायी प्रवासात आयआरसीटीसीकडून खवय्यांच्या जिभेचे विशेष चोचले पुरवण्यात येणार असून त्यांना साबुदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी-बेसन पोळा, सावजी चिकन, चिकन कोल्हापुरी, तांबडा रस्सा आदी खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवाशांना तिकीट आरक्षित करतानाच खाद्यपदार्थ निवडावे लागणार असून त्याचे पैसेही चुकते करावे लागणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सीएसएमटी-साईनगर आणि सीएसएमटी-सोलापूर या मार्गावरील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आठवड्यातून सहा दिवस धावणाऱ्या या गाडीत आयआरसीटीसीकडून प्रवाशांच्या नाश्त्याबरोबरच जेवणाची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

सकाळच्या नाश्त्यासाठी साबुदाणा-शेंगदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी-बेसन पोळा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पर्याय आहेत.
जेवणासाठी झुणका, शेंगदाणा पुलाव, धान्याची उसळ तसेच ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी प्रवाशांना मिळेल. सायंकाळच्या नाश्त्यामध्ये शेगावची प्रसिद्ध कचोरी, कोथिंबीर वडी, भरड धान्यांचे थालीपीठ, मिश्र धान्यांचे भडंग, साबुदाणा वडा असे पर्याय असणार आहेत.
सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मांसाहारी खवय्यांसाठी जेवणात सावजी चिकन, चिकन कोल्हापुरी, तांबडा रस्सा हे पदार्थ मिळतील.

गाडीमध्ये या सुविधा मिळणार
गाडीत प्रवाशांना वाय-फाय इन्पह्टेमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटिरियर्स, झोपण्यायोग्य असणे, टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्युम टॉयलेट, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंगची व्यवस्था, मिनी पॅण्ट्री, आपत्कालीन परिस्थितीत चालकाशी संवाद साधण्यासाठी टॉक-बॅक युनिट आदी सुविधा आहेत.