
रेडिओ क्लब जेट्टीमुळे प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार असा दावा राज्य शासनाने केला होता. मात्र रेडिओ क्लब जेट्टीवर अतिरिक्त दर आकारता, पण त्या दर्जाची सुविधा दिली जाते का, असा सवाल शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी केला.
आमदार अशोक पाटील यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक 5 आणि रॉयल बॉम्बे यॉट क्लबला दिलेल्या परवानगीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी चर्चेत भाग घेताना वरुण सरदेसाई यांनी जेट्टीवर सुविधा मिळत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. या लक्षवेधीला उत्तर देताना मत्स व्यवसायमंत्री नितेश राणे म्हणाले, गेट वे ऑफ इंडिया येथील पर्यटकांची वाढती गर्दी आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी ‘रेडिओ क्लब जेट्टी’ विकसित करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि शिस्तबद्ध सुविधा देण्यास आमचे प्राधान्य असेल.
गेट वे ऑफ इंडिया हा परिसर नौदलाच्या ‘हाय सिक्युरिटी झोन’मध्ये येतो. जेट्टी क्रमांक 5 वर होणारी अनियंत्रित गर्दी अपघातांना निमंत्रण देणारी ठरत होती. त्यामुळे मुंबई पोर्ट प्राधिकरणाने सुरक्षेच्या कारणास्तव येथे तरंगता तराफा (फ्लोटिंग पॉन्टून) उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.




























































