विद्रोही कवी वरवरा राव यांना ‘नानावटी’मध्ये हलवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्रोही कवी तसेच एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांना रविवारी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राव यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू होते. याचदरम्यान त्यांना इतर व्याधींचा त्रास जाणवू लागल्याने यूरोलॉजिकल उपचारासाठी नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

80 वर्षीय राव हे तळोजा तुरुंगात कैद होते. एल्गार परिषदेच्या माओवादी संबंधांवरून राव यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली होती. तुरुंगात असतानाच त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिक्ह आला. त्यानंतर त्यांना आधी जेजे व नंतर सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनावर गुरुवारपासून उपचार सुरू असतानाच त्यांना डेलिरियम विकाराचा त्रास असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डेलिरियम हा गंभीर स्वरूपाचा मानसिक विकार असून यात प्रचंड अस्वस्थता आणि तापसुद्धा येतो. त्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी नानावटी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. राव यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने तुरुंगातून रुग्णालयात दाखल करण्याची मागणी कुटुंबियांबरोबरच लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्य सरकारकडे केली होती.