
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदीच्या नवीन पुलावरची वाहतूक सध्या धोकादायक बनली आहे. या पुलावरील सिमेंट काँक्रिटीकरणातील लोखंडी सळ्या पुन्हा बाहेर पडल्याने अपघाताची शक्यता आहे. वाहनांची कायम वर्दळ असणारा हा मार्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहर व कळंबस्ते गावाच्या सीमेवर असणाऱ्या वाशिष्ठी नदीवर ब्रिटिशकालीन पुलांची आयुमर्यादा संपुष्टात आल्याने या ठिकाणी नव्याने दोन पुल उभारले जात आहेत. गेले काही वर्षे या पुलाचे काम रेंगाळले होते. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी, पुढारी व स्थानिक जनतेने आवाज उठवताच पुलाच्या कामाला गती मिळाली होती. त्यानंतर वाशिष्ठी नदीवरचा एक नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. लोकप्रतिनिधी, पुढाऱ्यांनी घाईगडबडीत या पुलाचे अनौपचारिक उद्घाटनही केले. मात्र काही दिवस लोटत नाही तोच वाहतुकीसाठी सुरु झालेल्या पुलावरचे सिमेंट काँक्रिटचा भाग काही ठिकाणी उडून पुलाच्या लोखंडी सळ्या बाहेर पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यावर चिपळूण तालुक्यातील नागरिकांनाही प्रचंड संताप व्यक्त केला होता.
त्याची तातडीने दखल घेत राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने संबंधित ठेकेदाराला या पुलावर पॅचवर्क करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्या ठिकाणी डांबर-खडीने पॅचवर्क करण्यात आले. मात्र काही दिवसानंतर आता त्या पुलाच्या मध्यवर्ती भागातही तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.





















































