
>> डॉ. रविराज अहिरराव
आज अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे नवीन घराची खरेदी होणं हे स्वाभाविक आहे. त्यानिमित्ताने तुमच्या गुंतवणुकीतून खऱया अर्थाने अर्थ प्राप्त करायचा असेल तर ती वास्तू फक्त आणि फक्त वास्तुशास्त्राच्या आधारावरच निवडली पाहिजे. तरच तुमच्या आयुष्यातील प्रगतीचा वेग, समाधान आणि शांती मोठय़ा प्रमाणावर द्विगुणित होईल.
मित्रहो, वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावर अपरिमित प्रभाव आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर वास्तुशास्त्राचा प्रभाव जन्माला येण्याअगोदर सुरू होतो, जन्मल्यावर घडणाऱया प्रत्येक घटनेवर त्याचा प्रभाव असतो आणि मृत्यूनंतरही वास्तुशास्त्रा आपल्यावर प्रभाव पाडत असतं. पण कसं?
संतानप्राप्ती आणि वास्तुशास्त्र यामधलं एक छोटंसं रहस्य सांगायचं झालं तर ईशान्य,आग्नेय आणि नैऋत्य या तीनही दिशा वास्तुशास्त्रानुसार संतुलित असतील तर संतानप्राप्तीमध्ये अडचणी येत नाहीत. ईशान्य आणि पूर्वेच्या मधल्या भागामध्ये त्यांनी त्यांचं वास्तव्य ठेवलं तर संतानप्राप्तीसाठी पूरक गुणधर्म त्यांच्यात निर्माण होतात. गरोदर स्त्रीने नैऋत्य दिशेला जास्तीत जास्त वास्तव्य करायचं असतं.
घरात पैसा येणं यासाठी उत्तर दिशा फार महत्त्वाची आहे. तुमच्याकडे आलेला पैसा किंवा कोणत्याही प्रकारची संधी – मग ती शैक्षणिक असो, नोकरी-धंद्यातील असो त्या संधीचं सोनं करण्याचं काम ईशान्य दिशा करते. पूर्व दिशा तुम्हाला ऐश्वर्य आणि लक्ष्मी दोन्ही प्राप्त करून देते आणि सोबत तुमचे सामाजिक, व्यावसायिक आणि बाकी सर्व क्षेत्रातील संपर्क अतिशय मजबूत करते. पूर्व आग्नेय दिशा तुमच्यातील विश्लेषण प्रवृत्तीला खतपाणी देते.
आग्नेय दिशा ही घरातील स्त्री शक्तीकेंद्र मानलं जातं. ही दिशा स्वयंपाकघराची मुख्य जागा मानली जाते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील आर्थिक चलनवलन (cashflow) आग्नेय दिशा प्रभावित करत असते. तुमच्या प्रत्येक कामामध्ये दिरंगाई, अडथळे किंवा वायफळ खर्च या गोष्टी जर होत असतील तर निश्चितच तुमच्या घरातील स्त्रीशक्ती म्हणजेच आग्नेय दिशा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने बिघडली आहे.
आग्नेय दिशा तुम्हाला उत्तर आणि ईशान्य दिशेच्या माध्यमातून मिळणाऱया प्रगतीला गती प्राप्त करून देत असते. त्यानंतर दक्षिण दिशा ही तुम्हाला आत्मविश्वास, समाधान आणि मनःशांती मिळवून देऊ शकते. इथे लाल रंग असेल तर उत्तम. अत्यंत जडत्व किंवा जडपणा या ठिकाणी असला पाहिजे.
नैऋत्य दिशा पुरुष शक्तीचं मुख्य केंद्र आहे. घरातील कप्तान; घरातीलच नव्हे तर सामाजिक, व्यावसायिक, औद्योगिक अशा प्रत्येक क्षेत्रातील कप्तान हा त्या त्या क्षेत्रातील सर्व लोकांना नियंत्रित करत असतो आणि अपेक्षित काम त्यांच्याकडून करून घेऊ शकत असतो. कारण तो नेतृत्व करत असतो. नैऋत्य दिशेला मास्टर बेडरूम असावं. नैऋत्य दिशेला प्रमुख मॅनेजरची केबिन किंवा प्रत्येक कारखान्यातील प्रमुख व्यक्तीची बसण्याची जागा असावी. नैऋत्य दिशा ही त्या व्यक्तीला, त्या घराला किंवा त्या उद्योगाला प्रचंड स्थैर्य प्राप्त करून देणारी दिशा असते असं आपण म्हणू शकतो. पण जर नैऋत्य दिशा बिघडली तर मात्र प्रचंड मोठय़ा प्रमाणावर आर्थिक हानी आणि पूर्णपणे स्थैर्य डगमगू शकतं.
पश्चिम वायव्य हा भाग तसं बघायला गेलं तर मनाची मरगळ टाकून देण्यासाठी एक उत्कृष्ट भाग आहे. पण जर तुमच्याकडे वास्तू दूषित झाली तर मात्र तोच भाग तणाव, निराशा, चिडचिड किंवा उद्वेग या गोष्टी निर्माण करत असतो. तसं असलं तरीही वास्तू उपाययोजना, रंगसंगती आणि रचना या माध्यमातून हे सगळे दुर्गुण आपल्याला दूर करता येतात.
वायव्य दिशा ही वायुतत्त्वाची दिशा आहे. हीच मुलांच्या बेडरूमची दिशा असावी. तुमच्या घरातील किंवा वास्तूमधील स्टोरेज आणि टॉयलेट यांची रचना करण्यासाठी तसंच व्यावसायिक जागेमध्ये सेल्स आणि मार्केटिंगसाठी आणि कारखान्यांमध्ये तयार झालेला विक्रीयोग्य माल एकत्रित ठेवण्यासाठी उत्कृष्ट स्थान म्हणजे वायव्य दिशा. कोणतंही कार्य सिद्धीस नेण्यासाठी, त्या कार्याला यशस्वी करण्यासाठी विविध घटकांकडून मदत मिळणं आवश्यक असतं. तो मदतीचा स्रोत वायव्य दिशा उपलब्ध करून देत असते.
उत्तर वायव्य या भागातील प्रवेशद्वार सर्वोत्कृष्ट मानले जाते. परंतु या ठिकाणी मुलांचं बेडरूम असणं अत्यंत घातक आहे आणि त्यातसुद्धा खास करून अशा काही विशिष्ट जागा आहेत की ज्यामुळे मुलांमध्ये वाईट गोष्टींबद्दलचं किंवा नको त्या गोष्टींबद्दलचं अतिआकर्षण निर्माण होऊन उमलत्या वयात येणाऱया मुलांचं आयुष्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा जागेची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं.
वास्तूचा मध्यभाग म्हणजे ब्रह्मस्थान हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. किंबहुना मी असे म्हणेन की संपूर्ण वास्तूमध्ये तुमच्या वास्तूचा मध्यभाग म्हणजेच ब्रह्मस्थान हा निश्चितपणे मोकळा असलाच पाहिजे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वजन असता कामा नये. पण आज जगातील 90 टक्के वास्तूंमध्ये ब्रह्मस्थानात वास्तुदोष असतोच असतो. ब्रह्मस्थान आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवते. एकीची शक्ती निर्माण करते. हे अत्यंत गरजेचं आहे. घरात दोन व्यक्ती असुदेत अथवा पंधरा असुदेत. तीच गत आहे कुठल्याही एखाद्या व्यावसायिक किंवा औद्योगिक आस्थापनेची. म्हणजे तिथेसुद्धा तुमच्याकडे काम करणाऱया माणसांमध्ये एकत्रितपणाची भावना ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यातूनच उत्कृष्ट निकाल मिळतो.
मित्रहो, मोठमोठय़ा गृह संकुलांमध्ये तसेच बहुमजली इमारतींमध्ये वास्तुशास्त्रानुसार घरांची निर्मिती करणं सहज शक्य आहे. ‘वास्तुरविराज’ ही संस्था आज जगातल्या क्रमांक एकच्या आर्किटेक्चर संस्थेबरोबर गृहनिर्माण संस्था निर्माण करताना तिथे सर्वाधिक वास्तुशास्त्र कसे योजता येईल या पद्धतीने काम करते. म्हणजे हिंदुस्थानातच नव्हे तर जागतिक पातळीवरसुद्धा वास्तुशास्त्रानुसार घरांची निर्मिती होत आहे आणि त्यात हळूहळू वाढ होत आहे. पण विक्रेत्यांच्या भुलथापांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. अतिशय सजग आणि सतर्क होऊन वास्तुशास्त्रानुसार घर खरेदी करा.
(लेखक ज्येष्ठ वास्तुतज्ञ आहेत)




























































