
हिंदु धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुळशीला आपण देवतुल्य मानतो. तिची पूजा करण्याचे काही नियमही शास्त्रात सांगण्यात आले आहेत. भगवान विष्णुला प्रिय असणारी तुळस पूजेच्या वेळी आवश्यक असते. तुळशीच्या रोपट्यात लक्ष्मीदेवीचा वास असतो, असे सांगितले जाते. घराच्या अंगणात तुळशीचे झाड लावल्यास नकारात्मकता नष्ट होते शिवाय तुळशीमध्ये औषधी गुणधर्मही असतात. घराच्या अंगणात तुळस लावण्याचे जेवढे महत्त्व आहे, वास्तुशास्त्रानुसार तेवढेच महत्त्व ‘या’ झाडांचेही आहे. जाणून घेऊया
शमी
तुळशीप्रमाणेच शमीचे झाडही शुभ मानले जाते. शमी वृक्षाचा संबंध शनिदेवाशी आहे. शनिवारी शमीची पूजा केल्याने शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. शमीचे रोपटे तुळशीसोबत लावले तर दुप्पट फायदा होतो.
काळा धोतरा
धोतऱ्याचे फूल शंकराला वाहिले जाते. या वृक्षामध्ये शिवाचा वास असतो. त्यामुळे अंगणात धोतऱ्याचे झाड लावणे शुभ मानले जाते. हे झाड लावल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद लाभतो. मंगळवारी काळ्या धोतऱ्याचे रोपटे अंगणात लावावे.
केळ्याचे झाड
अंगणात केळ्याचे झाड लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मकता दूर व्हायला मदत होते शिवाय घरात सुख-समृद्धि येते. आर्थिक लाभही होण्यास सुरुवात होते. तुळशीच्या झाडाजवळ केळ्याचे झाड लावल्याने आर्थिक सुबत्ता प्राप्त होते, मात्र केळ्याचे झाड घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावावे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला तुळशीचे रोप लावावे. ही दोन्ही झाडे एकाच ठिकाणी लावू नये.