
कोरोनामुळे मार्च 2020 पासून तब्बल दीड वर्ष बंद असलेले पालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय आजपासून पर्यटकांसाठी खुले झाले आहे. शिस्त, नियम आणि कोरोना खबरदारी घेऊन पहिल्याच दिवशी 1621 पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली. यामुळे पहिल्याच दिवशी प्रशासनाला 68 हजार 725 रुपयांचा महसूल मिळाला. संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी ही माहिती दिली.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. यानंतर काही दिवसांतच वेगाने रुग्णवाढ सुरू झाल्याने 23 मार्च 2020 पासून देशभरातच लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पुन्हा 15 फेब्रुवारी 2021 पासून उद्यान पुन्हा पर्यटकांसाठी कोरोना खबरदारी घेऊन सुरू करण्यात आले. मात्र कोरोनाची दुसरी मोठी लाट आल्याने 4 एप्रिलपासून पुन्हा उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. मात्र आता कोरोनाची दुसरी लाटही पूर्ण आटोक्यात आली असून अनेक निर्बंधही शिथील करण्यात आल्याने उद्यान व प्राणी संग्रहालय आज 1 नोव्हेंबरपासून पुन्हा खुले करण्यात आले आहे. तीन वर्षांखालील आणि ज्येष्ठांना मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश देण्यात आला नाही.
दरम्यान, पर्यटकांना सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तर सकाळी 6 ते 8.30 पर्यंत मार्ंनग वॉकसाठी उद्यान खुले राहणार आहे. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक राहणार असून ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि 5 वर्षांखालील लहान मुलांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे किंवा विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पालिकेचा महसूल वाढणार
पर्यटक वाढल्याने उद्यान व प्राणी संग्रहालयाला दररोज सुमारे दीड लाखांचे, महिन्याला 45 लाखांचे तर वर्षाला 8 ते 10 कोटी उत्पन्न मिळते. मात्र गेल्या दीड वर्षापासून उद्यान बंद असल्याने दररोज दीड लाखाचे नुकसान होत आहे. त्यामुळे उद्यान सुरू झाल्यामुळे पालिकेला पुन्हा मोठा महसूल मिळणार आहे.





























































