भाजीपाला विकणार्‍या महिलेचा मुलगा बनला सी.ए. 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदपूर

जिद्द व मेहनतीच्या बळावर माणूस कोणत्याही उच्चपदस्थ पदापर्यंत पोहोचू शकतो हे अनेकांनी दाखवून दिले आहे. तरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भाजी पाला विकणाऱ्या आईला मदत करून उच्च शिक्षण घेऊन चार्टर्ड अकांउटण्ट अर्थात सी.ए.ची परीक्षा नुकतीच पास झालेल्या नारायण केंद्रे या तरुणाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. नारायण नुकत्याच झालेल्या चार्टर्ड अकाउंटण्ट परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

आनंदवाडी (काळेगाव) तालुका अहमदपुर येथील बाबूराव केंद्रे यांचे १९९७ साली निधन झाले. त्यांना तीन अपत्य होती. नुकताच सी.ए.झालेला नारायण हा अवघ्या पावणे दोन वर्षाचा होता. वडिलांचे छत्र हरवलेल्या तीन्ही मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आई आशाबाई यांच्यावर आली. मुलांच्या पालनपोषणासाठी अहमदपुर येथील भाजी मंडई त्यांनी भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. आजही भाजी मंडईत त्यांचे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. याच दुकानावर सुट्टीच्या काळात तर कधी शाळेच्या वेळेत नारायण आईला भाजीपाला विकण्यासाठी मदत करायचा. त्याचे प्राथमिक शिक्षण गावतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण अहमदपुर येथे पूर्ण झाले त्या नंतर मात्र उच्च शिक्षणासाठी तो पुण्याला गेला. तिथे बीएमसी कॉलेजमधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. नंतर अकाउंट या विषयात तो नेट ही परीक्षा उत्तीर्ण झाला. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंट ऑफ इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या सी.ए.परिक्षेत तो नुकतीच उत्तीर्ण झाला आहे.

ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन वेगळी वाट निवडून सी.ए. झालेल्या नारायणवर समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आजवर जे कष्ट उपसले त्याचे फळ आता मिळाल्याची प्रतिक्रिया नारायणच्या आई आशाबाई केंद्रे यांनी यावेळी व्यक्त केली.