पिंपरीत पुन्हा वाहनांची तोडफोड; नागरिकांमध्ये दहशत

443

लॉकडाउन शिथील झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना पुन्हा सुरू झाल्या आहेत. रविवारी पहाटे नेहरूनगर, पिंपरी येथे अज्ञात व्यक्तीने पाच वाहनांची तोडफोड केली. यामुळे नेहरूनगर भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरूनगर परिसरातील पाच वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. ही घटना रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वाहनांच्या काचा फोडताना नागरिकांनी कोणालाही पाहिलेले नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. त्यामुळे या घटनेची चौकशी करणे कठीण होणार आहे. शहरातील वाहनांच्या तोडफोडीचे सत्र अद्यापही कायम आहे. पोलिसांनी चौकशीसाठी गाडी थांबविल्याच्या कारणावरून एकाने पोलिसांच्याच वाहनांची तोडफोड केली होती. ही घटना बोपखेल येथे 10 मे रोजी घडली. त्यानंतर 18 मे रोजी चिंचवडच्या बिजलीनगर भागात दहशत निर्माण करण्यासाठी एका टोळक्याने 13 वाहनांची तोडफोड केली होती.

पिंपळे सौदागर येथील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर मोटार चालकाला मारहाण करीत परिसरातील काही वाहनांची तोडफोड केली होती. ही घटना 21 मे रोजी घडली. त्यानंतर घरकुल, चिखली येथे आक्या बॉण्ड टोळीतील काही जणांनी शनिवारी परिसरातील वाहनांची तोडफोड केली होती. गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात सुरू झालेले वाहनांच्या तोडफोडीचे सत्र अद्यापही कायम आहे. प्रत्येक महिन्यात वाहनांच्या तोडफोडीच्या किमान दोन घटना घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या