दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांची ‘वाहनखरेदी’ धडाक्यात! गतवर्षीपेक्षा यंदा 1,152 वाहनांची वाढ

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांनी यंदा वाहन खरेदीत उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. वसुबारस, धनतेरस, लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दिवाळीतील शुभमुहूर्तांदरम्यान एकूण १३ हजार ३८७ नवीन वाहनांची नोंदणी झाली. यात ८ हजार ७६३ दुचाकी आणि २ हजार ७८६ चारचाकींचा समावेश आहे. तर, इतर अन्य वाहने आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहनखरेदीत किंचित वाढ झाली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे येथे दि. ८ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ही नोंद झाली. गेल्या वर्षी (दि. १९ ते २८ ऑक्टोबर) एकूण १२ हजार २३५ वाहनांची खरेदी झाली होती. त्यामुळे यंदा पुण्यात वाहन खरेदीत तब्बल १ हजार १५२ वाहनांची वाढ झाल्याचे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. नवीन वाहन खरेदीचा आनंद घेताना पुणेकरांनी आपली नवी वाहने सजवून, त्यांची मुहूर्तावर विधिवत पूजा करून घरी नेली. यामुळे शहरातील वाहन विक्री दालनांबाहेर दिवसभर गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांनी केवळ वाहनच नव्हे, तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मालमत्ता, दागदागिने यांसह नवनवीन वस्तूंची खरेदी केली.

अनेकांनी आपल्या नव्या गाड्यांचे लक्ष्मीपूजन करून कुटुंबासह वाहन घरी नेण्याचा आनंद घेतला. शोरूमसमोर लगबग आणि फोटोंसाठी उभे असलेले ग्राहक, असे वातावरण दिवसभर दिसले. दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांना वेळेत वाहन घरी घेऊन जाता यावे म्हणून आरटीओ कर्मचाऱ्यांकडून मेहनत घेतली जात आहे. नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. वाहनविक्रेत्यांकडून आलेल्या नोंदणी अर्जाचे तत्परतेने परीक्षण करून नोंदी वेळेत पूर्ण करण्यात येत असल्याचे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले.