फिर भी जीत हिंदुस्थानी; वेल्लालागेच्या झुंजीनंतरही हिंदुस्थान अंतिम फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झुंज आणि संघर्षानंतर हिंदुस्थानने सामना जिंकला असला तरी वेल्लालागेच्या अष्टपैलू खेळाने सर्वांची मनं जिंकली. वेल्लालागेच्या गोलंदाजीने हिंदुस्थानी संघाची फिरकी घेतल्यानंतर तोच श्रीलंकेच्या विजयासाठी शेवटपर्यंत लढला, पण कुलदीपने सलग दोन त्रिफळे उडवत वेल्लालागेच्या विजयाच्या प्रयत्नांना उद्ध्वस्त केले. कमी धावसंख्येच्या या सामन्यात हिंदुस्थानने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करत सुपर-फोरमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद करत दहाव्यांदा आशिया चषकाच्या अंतिम फेरी थाटात एण्ट्री केली.

हिंदुस्थानचा डाव 213 धावांत गुंडाळल्यानंतर गोलंदाजांनी श्रीलंकेची 6 बाद 99 अशी अवस्था करत सामन्यावर पकड मिळवली होती, पण त्यानंतर फिरकीने कमाल दाखवणाऱ्या दुनिथच्या बॅटनेही धमाल केली. त्याने धनंजया डि’सिल्वासह 63 धावांची अफलातून भागी रचत लंकेच्या विजयाच्या आशा वाढवल्या, पण कुलदीपने तळाच्या कसुन रजिथा आणि मथीश पथिराणाला त्रिफळाचीत करून वेल्लालागेला स्ट्राइकच मिळू दिली नाही. वेल्लालागे 42 धावांवरच नाबाद राहिला. कुलदीप यादवने सलग दुसऱ्या सामन्यात चार विकेट घेतल्या.

त्याआधी एकटय़ा रोहित शर्माचा अपवाद वगळता हिंदुस्थानी डावात एकाही फलंदाजाची खेळी पन्नाशी ओलांडू शकली नाही. रोहित शर्मा आणि शुबमन गिलने आजही दमदार सलामी दिली. दोघांनी 80 धावांची सलामी दिल्यानंतर हिंदुस्थानी डावाला वेल्लालागेच्या फिरकीने हादरविले. त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर गिलचा त्रिफळा उडवत श्रीलंकेला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर त्याने पुढच्या दोन षटकांतही विराट कोहली आणि रोहित शर्माची विकेट घेत ओव्हर हॅटट्रिक घेतली. त्याच्या फिरकीमुळे बिनबाद 80 असलेला हिंदुस्थान 3 बाद 91 असा अडचणीत सापडला.

राहुल-इशानने सावरले
तीन धक्क्यांनंतर राहुल आणि इशानने 63 धावांची भागी रचून हिंदुस्थानचा घसरगुंडीला रोखले, पण ही जोडीसुद्धा वेल्लालागेनेच फोडली. त्याने स्वतःच्याच गोलंदाजीवर राहुलचा झेल टिपला. मग असलंकाच्या गोलंदाजीवर वेल्लालागेनेच इशानचाही सुरेख झेल घेतला. पुढच्याच षटकात हार्दिक पंडय़ालाही बाद करत आपल्या कारकीर्दीतील पहिले पाच बळी टिपले. तो सर्वात कमी वयात पाच विकेट टिपणारा श्रीलंकन गोलंदाज ठरला.

वेल्लालागेबरोबर असलंकानेही आपल्या फिरकीची कमाल दाखवली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा हिंदुस्थान 9 बाद 197 या धावसंख्येवर होता आणि हे सर्व विकेट वेल्लालागे आणि असलंकानेच टिपले होते. शेवटी अक्षर पटेलने 26 धावा ठोकत हिंदुस्थानला 213 पर्यंत नेले. त्याची विकेट तीक्षणाने घेतली.

रोहित दहाहजारी
रोहित शर्माने 22 वी धाव काढताच वन डेत दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. तो हा टप्पा ओलांडणारा जगातील 15 वा फलंदाजही ठरला. तसेच सचिन, विराट, गांगुली, द्रविड, धोनी यांच्या पाठोपाठ ‘दहा हजारी मनसबदार’ ठरला.