लाल मातीतल्या कलावंताने बांधलं वसुंधरा इको हाऊस, वेंगुर्ल्यातील अमित तेलीच्या कल्पकतेला मिळतेय दाद

एका लहान गावात एक छान टुमदार कौलारू घर असावे. घरासमोर अंगण असावे, बाग असावी. शेणाचे सारवण, लाकडी माळा आणि मातीचे लिंपण असलेल्या भिंती असाव्यात… शहरातील धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून काही क्षण निसर्गात लीन होऊन जावं असं प्रत्येक शहरी माणसाला वाटतं. मालवणजवळील परुळे गावात अमित तेली यांनी असंच 800 चौरस फुटांचे चिखलमातीचे सुंदर घर बांधले आहे. वसुंधरा इको हाऊस असे या घराचे नाव आहे. मातीतल्या कलाकारानं उभारलेलं मातीचं घर अनेकांचे आकर्षण ठरले आहे.

घर जास्त मोठे नसावे, पण निसर्गाशी एकरूप असावे. घरात मानवनिर्मित ऊर्जेचा कापर कमीत कमी असावा आणि स्थानिक नैसर्गिक साहित्याने ते बांधले जावे अशी अमित तेली याची इच्छा होती. अमितने जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून फाईन आर्टची डिग्री मिळवली. पण त्याला गावाची आणि स्वप्नातील घराची ओढ लागली होती. तो गावाकडे पतरला. त्याने 2015 साली इको व्हिलाचे डिझाईन तयार केले. प्रत्यक्ष कामाला 2017 साली सुरुवात केली. 11 महिन्यांत अमितच्या स्वप्नातील मातीचे घर उभे राहिले. एका वेळी जास्तीत जास्त 2 ते 8 जण येथे राहू शकतात.

teli-home-1

मी शिक्षणासाठी फक्त मुंबई गेलो होतो. गावी स्थायिक व्हायचं तर चांगला पर्याय शोधायचा होता. फाईन आर्टचे शिक्षण घेतल्याने तसा मी कॉल पेंटिंग, सेट डिझाईनची कामे करत होतो. त्यातून आर्टिटेक्चर, इंटेरियरची माहिती झाली होती. त्यामुळे वसुधंरा इको हाऊसचे डिझाईन तयार केले. काहीतरी अँटिक साकारावं असा विचार करून मातीचं घर बांधले. त्यासोबतच घाण्यावर खोबरेल तेल काढण्याचा कुटुंबाचा पारंपरिक व्यवसायही सुरू केलाय, अशी प्रतिक्रिया अमित तेली याने दिली.

teli-home

निसर्गाशी एकरूप वास्तू

  • दगडी पायावर मातीच्या जाडजूड भिंती, मातीच्या जमिनीला शेणाचे सारवण यामुळे नैसर्गिक थंडाका अनुभवता येतो.
  • वसुंधरा हे मॉडर्न क्ले हाऊस आहे. त्यामध्ये कोणतेही वीज मीटर नाही. सौर ऊर्जेवर घराच्या विजेची गरज भागवली जाते.
  • घडय़ाळापासून कचराकुंडीपर्यंत सारं काही झाडाच्या खोडाचं आणि बांबूचं. प्लॅस्टिकचा कुठेही वापर नाही.
  • दगडी जातं, उखळ, वरवंटा आदी वस्तू, गावात फिरायला सायकल आणि सोबत मालवणी पद्धतीचे चुलीवरचं जेवण.
आपली प्रतिक्रिया द्या