
भाजपाचे वर्चस्व असलेल्या वेंगुर्ला तालुक्यात आणि शिंदे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कुडाळ तालुक्यात शिवसेनेने थेट शिरकाव करत सत्ताधाऱ्यांचे राजकीय गणित कोलमडवले आहे. जिल्हा परिषदेच्या 3 तर पंचायत समितीच्या 7 जागांवर शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भगवा फडकवला.
कुडाळ तालुक्यातील पिंगळी मतदारसंघातून शिवसेनेचे गंगाराम सडवेलकर विजयी झाले. भाजपाचा किल्ला मानल्या जाणाऱया वेंगुर्ला तालुक्यातील आडेली मतदारसंघात शिवसेनेचे विजय नाईक यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष समिधा नाईक यांचा पराभव केला. उभादांडा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय गावडे विजयी झाले असून भाजपाचे मनवेल फर्नांडिस पराभूत झाले आहेत.
पंचायत समितीत दुहेरी धक्का
पंचायत समिती निवडणुकांतही शिवसेनेने भाजप शिंदे गटाला दुहेरी धक्का दिला. देवगड तालुक्यातील मणचे मतदारसंघातून शिवसेनेचे विष्णू गाडी यांनी शिंदे गटाच्या विलास साळसकर यांचा पराभव केला. कुडाळ तालुक्यातील कसाल मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष कांदळगावकर यांनी शिंदे गटाचे बापू पाताडे यांना धूळ चारली. नेरूर देऊळवाडा उत्तरमधून शिवसेनेच्या दीप्ती नाईक विजयी झाल्या असून त्यांनी शिंदे गटाच्या नीता नाईक यांचा पराभव केला. नेरूर देऊळवाडा दक्षिणमधून शिवसेनेच्या अर्चना बंगे यांनी भाजपच्या ममता देसाई यांना पराभूत केले. पिंगळी मतदारसंघात शिवसेनेच्या ममता राऊळ यांनी भाजपच्या साधना माडये यांचा पराभव केला. माणगाव मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश धुरी विजयी झाले असून शिंदे गटाचे काwशल जोशी पराभूत झाले आहेत.





























































