पाठलाग करून आवळल्या सायबर ठगाच्या मुसक्या

वर्सोवा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सायबर ठगाला बेडय़ा ठोकल्या. ओमप्रकाश सिंह कठिन सिंह ठाकूर असे त्याचे नाव आहे. त्याचे इतर तीन साथीदार हे पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ते तिघे ठाकूरला सिमकार्ड आणि नवीन बँक खात्याचे तपशील घेऊन आल्याचे तपासात समोर आले आहे.

गुरुवारी वर्सोवा पोलिसांच्या निर्भया पथकाचे वाहन गस्त करत होते. सायंकाळच्या सुमारास जानकी देवी पब्लिक स्कूलच्या रस्त्याला चार जण उभे होते. पोलिसांना पाहताच ते पळून जाऊ लागले.  खाडीलगत असलेल्या भिंतीवर चढून ते पळून जात होते. तेव्हा पोलिसांनी ठाकूरला पकडले. तर तीनजण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर पोलिसांनी ठाकूरची कसून चौकशी केली. ठाकूर हा मध्य प्रदेशचा रहिवासी असून महिनाभरापूर्वी तो मुंबईत आला. तो शहरातील विविध हॉटेलमध्ये राहत होता. चार महिन्यांपूर्वी त्याची जॉन नावाच्या एकाशी टेलिग्रामवर ओळख झाली.

ठगाने त्याला टेलिग्रामवर बनावट नावाने खाते उघडण्यास सांगितले. फसवणुकीचे पैसे वळते करण्यासाठी बँक खाते आवश्यक असल्याचे त्याला सांगितले. ठाकूर हा ती माहिती जॉनला पुरवत असायचा. जे कोणी बँक खात्याची माहिती घेऊन येतील त्यांना हॉटेलमध्ये ठेवले जात असायचे. त्या बनावट नावांच्या खात्यात पैसे वळते झाल्यावर काहींना तो सोडत असायचा.

सरकारी बँकांमध्ये उघडली खाती  

पोलिसांनी ठाकूरकडून चार मोबाईल, सिमकार्ड, तीन बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, गाडीचे आरसी बुक, वाहन चालवण्याचा परवाना, 12 बँकेची विविध नावाने एटीएम कार्ड, नाशिक येथील एका सरकारी बँकेत दोन जणांच्या नावाने असलेले पासबुक, सोलापूर येथील दोन जणांच्या नावाचे चेकबुक, जप्त केले. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.