वर्सोव्यात राज्यस्तरीय शालेय कबड्डीचा दम घुमणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धा म्हणजे शाळा असो की शिक्षण विभाग, यांच्यासाठी केवळ एक औपचारिकता असते. 17 वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा आयोजनाच्या निमित्ताने वर्सोवा येथील चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर हायस्कूलमध्ये मात्र एक वेगळेच दृश्य बघायला मिळतेय. या शाळेतील स्पर्धा आयोजनाची पूर्वतयारी ही राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांच्या नियोजनाला मागे टाकेल अशी आहे. 1 आणि 2 नोव्हेंबरला ही राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा होणार असली तरी त्यानिमित्ताने शाळेत चार दिवस निवासासाठी येणाऱया 300हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि पाहुण्यांची खाण्यापिण्याची उत्तम सोय आम्ही केली आहे. स्पर्धा शालेय पातळीवरची असली तरी विद्यार्थ्यांच्या मनात भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची जिद्द आणि प्रेरणा निर्माण व्हावी हा आमचा हेतू आहे, असे शाळेचे विश्वस्त अजय कौल यांनी सांगितले. राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळणे निश्चितच गौरवास्पद आहे. गेले दोन आठवडे आम्ही या स्पर्धेची पूर्वतयारी करत असून राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटूंच्या सल्ल्याने आम्ही शाळेच्या मैदानाचे जेसीबी लावून सपाटीकरण करून घेतले. तसेच मैदानातील माती चाळून घेतली. कबड्डीच्या नियमानुसार दोन कबड्डी मैदाने आखून घेतली, अशी माहिती अजय कौल यांनी पुढे दिली.