सुप्रसिद्ध अभिनेते सतीश शहा यांचे निधन, 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलीवूड आणि टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता सतीश शहा यांचे निधन झाले आहे. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली मिळालेल्या माहितीनुसार, सतीश शहा गेल्या काही काळापासून किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते. सतीश शहा यांच्यावर 26 ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार होतील.

74 व्या वर्षी सतीश शहा यांनी या जगाचा निरोप घेतला. चित्रपट आणि टीव्ही जगतात शोककळा पसरली आहे. सतीश शहा यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु त्यांना घराघरात ओळख मिळवून दिली ती प्रसिद्ध टीव्ही शो ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मधील इंद्रवदन साराभाई उर्फ इंदू या भूमिकेने. या कॉमेडी शोमधील त्यांचे काम आजही लोकांच्या मनात घर करून आहे.

सतीश शहा यांचा जन्म गुजरातमधील मांडवी येथे झाला होता. झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून आपले शिक्षण पूर्ण केले.
सतीश शहा यांनी आपल्या करिअरची सुरुवात बॉलीवूड चित्रपटातून केली होती. त्यांचा पहिला चित्रपट भगवान परशुराम होता. त्यानंतर ते अरविंद देसाई की अजीब दास्तान, गमन, उमराव जान’, ‘शक्ति’, ‘जाने भी दो यारों’, ‘विक्रम बेताल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसले. फक्त हिंदीच नाही तर गम्मत जम्मत, वाजवा रे वाजवा सारख्या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं.