आजारावर मात करून विद्याधर जोशी पुन्हा रंगमंचावर, ‘सुंदर मी होणार’ नाटकात साकारणार भूमिका

दीर्घ आजारामुळे काही काळ रंगभूमीपासून दूर गेलेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी आता सात वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. पु.ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकाच्या नव्या सादरीकरणातून ते रंगभूमीवर येत आहेत. आजारानंतर रंगमंचावर परतणे हे फक्त शारीरिक नव्हे, तर मानसिक सामर्थ्याचेही मोठे परीक्षण असते, असे विद्याधर जोशी म्हणाले.

‘सुंदर मी होणार’ या नाटकात विद्याधर जोशी एका संस्थानिक घराण्याच्या फॅमिली डॉक्टरची भूमिका साकारत आहेत. ही भूमिका म्हणजे त्याग, प्रेम आणि माणूस म्हणून जगणे काय असते याचा अत्यंत हळुवार नमुना आहे. या भूमिकेबाबत विद्याधर जोशी म्हणाले, “पुलंचे हे एक अत्यंत गाजलेले नाटक आहे आणि यात डॉ. लागूंनी केलेली भूमिका मला करायची आहे, हे कळल्यावर मी क्षणभर थबकलो. कारण त्या भूमिकेची मोठी जबाबदारी आपल्यावर येते आहे, हे जाणवलं. मग मी संहिता वाचून ती भूमिका स्वीकारली.’’ या नाटकाचा पहिला प्रयोग 12 जून रोजी पुण्यात आणि 13 जून रोजी मुंबईत होणार आहे.