
सामना प्रतिनिधी, मुंबई
लोकशाहीची गळचेपी होते असे म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केली आहे. विलेपार्ले येथे आज त्यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांबरोबर ही प्रतिक्रिया दिली.
लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याचे म्हटले जाते, यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी असे म्हणणाऱ्याला माझ्या समोर आणा. या देशात प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. याला मतदान करा किंवा करू नका, असे कोणीही बिनदिक्कतपणे सांगू शकतो. मग गळचेपी होते हे खरे आहे का, अशी ओरड करणारे कोण आहेत, त्यांना माझ्यासमोर आणा, असे ते म्हणाले. मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी एन्जॉय करणारे आणि मतदानाकडे पाठ फिरवणारे या देशाचे पहिल्या क्रमांकाचे शत्रू आहेत. लोकांना घराबाहेर पडलेच पाहिजे. कोणी सत्तेत यावे, हा आपला अधिकार आपण बजावलाच पाहिजे, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

























































