ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित शरद जांभेकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित शरद जांभेकर यांचे अल्पशा आजाराने लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. जांभेकर यांना ताप आणि अशक्तपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले, सुना असा परिवार आहे.

पंडित शरद जांभेकर हे संगीताचार्य द. वि. काणेबुवां यांचे ज्येष्ठ शिष्य होत. शास्त्रीय, सुगम, नाटय़ या प्रकारांमध्ये त्यांची विशेष पकड होती. त्यांनी अनेक संगीत नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. संगीत सौभद्र नाटकातील ‘राधाधर मधु मिलिंद’ हे त्यांचे नाटय़गीत विशेष गाजले. कर हा करी धरीला, चंदनाचे परिमळ अम्हा काय त्याचे, रवि मी हा चंद्र कसा, चंदनासी परीमल, अष्टविनायका तुझा महिमा कसा, गंगा आली रे अंगणी अशा शेकडो गीतांना त्यांनी स्वरसाज चढवला. जांभेकर हे मुंबई आकाशवाणी केंद्रात अनेक वर्षे निर्माता म्हणून कार्यरत होते. काही काळ त्यांनी सांगली आकाशवाणी केंद्रातही नोकरी केली. त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अनेक गाण्यांमध्ये कोरस म्हणून साथ दिली होती.