ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन; वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देशात पर्यावरणवादाची बीज रोवणारे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन झाले. बुधवारी रात्री उशिरा पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. माधव गाडगीळ यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी एक निवेदन जारी करत ही माहिती दिली.

पर्यावरण चळवळीचे आधारस्तंभ आणि पश्चिम घाटांच्या जैवविविधतेचे कट्टर रक्षक मानले जाणारे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी 4 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माधव गाडगीळ यांचा अल्प परिचय

  • डॉ. गाडगीळ यांचा जन्म 24 मे 1942 रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले.
  • तत्कालीन पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथून त्यांनी जीवशास्त्रातील पदवी शिक्षण घेतले.
  • हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात पीएच. डी. मिळवली. ते हार्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम
  • संगणन केंद्राचे तसेच उपयोजित गणितशास्त्र विभागाचे फेलो होते.
  • 1973 ते 2004 या कालावधीत ते बंगळुरू येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये प्राध्यापक होते. त्यांनी तेथे ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली.