डॉ . श्रीराम लागू – अभिनयाचा महामेरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ . श्रीराम लागू यांचे पूर्ण नाव डॉ . श्रीराम बाळकृष्ण लागू. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा येथे झाला. ‘नटसम्राट’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ . श्रीराम लागू. अभिनय क्षेत्रातील एक तेजस्वी पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खर्‍या अर्थाने रमले ते नाटकातच. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.

नाटकाच्या ओढीने डॉक्टर रंगभूमीवर

शालेय जीवनापासून त्यांचा नाटकाकडे ओढा होता. पुण्यातील पी.डी.ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात कामे करायला सुरुवात केली. 1950च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात 5 वर्षे काम केले व नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. 1960च्या दशकात पुणे आणि टाबोरा , टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. 1969 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. एम.बी.बी.एस. झाल्यावर वैद्यकीय व्यवसायात जम बसत असतानाही केवळ नाटकाच्या ओढीने डॉ. लागूंनी रंगभूमी कलावंत म्हणून प्रवास सुरू केला. पी.डी.ए., रंगायन, थिएटर युनिट, कलावैभव, गोवा हिंदू, रूपवेध, आविष्कार, आय.एन.टी. या मान्यवर नाट्यसंस्थांच्या नाटकातून विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला.

दिग्दर्शन आणि चरित्र भूमिका

अभिनयाशिवाय त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले. त्यात गुरू महाराज गुरू, गिधाडे, हिमालयाची सावली, गार्बो, उद्ध्वस्त धर्मशाळा, कस्तुरीमृग, एकच प्याला, शतखंड, चाणक्य विष्णुगुप्त, किरवंत इत्यादी. ‘कांती मडिया’ या अनुवादित गुजराथी नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. तसेच एक होती राणी आणि ऍन्टीगनी या दोन नाटकांचे नाटककार श्रीराम लागू होते. वसंत कानेटकर आणि वि . वा . शिरवाडकर यांच्या नाटकांतल्या आव्हानदायी चरित्र भूमिका त्यांनी समर्थपणे हाताळल्या. गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे यांच्यापासून तो प्र. ल. मयेकर, प्रेमानंद गज्वी आणि श्याम मनोहर यांच्यासारख्या नाटककारांच्या  ‘प्रायोगिक’ कृतीही त्यांनी उत्साहाने हाताळल्या. मोहन तोंडवळकर, सुधीर भट आणि मोहन वाघ यांच्यापासून तो गोवा हिंदू असोसिएशन आणि इंडियन नॅशनल थिएटरसारख्या संस्थांतही त्यांनी काम केले. सत्यदेव दुबे यांच्या प्रागतिक संस्थेसाठी डॉक्टरांनी तेंडुलकरांचे  ‘गिधाडे’ हे खळबळजनक नाटक दिग्दर्शित केले आणि त्यात स्वतः मध्यवर्ती भूमिकाही केली. डॉ. श्रीराम लागूच्या रंगभूमीवरच्या एकाहून एक सरस भूमिक गाजल्या. त्यातही नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेने अभिनय कारकिर्दीला हिमालयाची उंची गाठून दिली. पत्नी दीपा श्रीराम यांनी निर्मिती केलेल्या  ‘झाकोळ ’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.

‘सामना’ रंगला… ‘सिंहासन’ही दमदार

शांताराम बापूंच्या ’ पिंजरा’तल्या अभिनयाने इतिहास घडवला . सामना,  सिंहासन ,  मुक्ता  यांसारख्या चित्रपटांमुळे डॉ. लागू आणि राजकीय चित्रपट हे समीकरण जुळले. ‘पिंजरा’तली भूमिका आव्हानात्मक होती. एकाच चित्रपटात लागूंनी दुहेरी अभिनय केला होता. चित्रपटाच्या सुरुवातीला एका संस्कारक्षम, जीवनातील सर्व मूल्यं सांभाळून असणारा शिस्तप्रिय शिक्षक, तर चित्रपटांच्या उत्तरार्धात सर्व संस्कार लयाला गेलेली एक असहाय, केविलवाणी, स्वतःचं सर्व अस्तित्व घालवून बसलेली व्यक्ती. एकाच चित्रपटातली आपली ही दोन रूपं अभिनयाच्या ताकदीवर लागूंनी इतकी अप्रतिम साकारलीत की, आजही हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचा इतिहास वर्णन करताना तो या भूमिकेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. निळू फुले आणि श्रीराम लागूंचा ‘सामना’ ही चांगलाच रंगला. आणि लागूंच्या सिंहासनलाही रसिकांनी दाद दिली. सुगंधी कट्टा, देवकीनंदन गोपाला, चंद्र आहे साक्षीला, आदी यशस्वी चित्रपटांची मालिकाच सुरू झाली. हिंदीतही श्रीराम लागूंनी अभिनयाच्या उंचीने चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातली. मराठीत काम करताना त्यांना हिंदीतही ऑफर आल्या. लागू हिंदीत गेले खरे, पण त्यात ठसा उमटू शकेल अशा भूमिका त्यांच्या वाट्याला क्वचितच आल्या. हिंदीत चरित्र अभिनेत्याच्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या.

गाजलेली नाटके

अग्निपंख (रावसाहेब)

अँटिगनी (क्रेयाँ)

आकाश पेलताना (दाजीसाहेब)

आत्मकथा (राजाध्यक्ष)

आंधळ्यांची शाळा (आण्णासाहेब, विश्वनाथ)

आधे अधुरे (यात 4 भूमिका केल्या आहेत.)

इथे ओशाळला मृत्यू (संभाजी)

उद्याचा संसार (विश्राम)

उध्वस्त धर्मशाळा (श्रीधर)

एकच प्याला (सुधाकर)

एक होती राणी (जनरल भंडारी)

कन्यादान (नाथ देवळालीकर)

कस्तुरीमृग (रावबहादूर पेंडसे)

काचेचा चंद्र (बाबुराव)

किरवंत (सिद्धेश्वरशास्त्री)

खून पहावा करून (आप्पा)

गार्बो (पॅन्सी)

गिधाडे (रमाकांत)

गुरु महाराज गुरू (गुरुनाथ)

चंद्र आहे साक्षीला

चाणक्य विष्णुगुप्त (चाणक्य)

जगन्नाथाचा रथ (भुजबळ, सखा)

डॉक्टर हुद्दार (हुद्दार)

दुभंग

दूरचे दिवे (सदानंद)

देवांचे मनोराज्य (विष्णू)

नटसम्राट (बेलवलकर)

पप्पा सांगा कुणाचे (पप्पा)

पुण्यप्रभाव (वृंदावन)

प्रतिमा (चर्मकार)

प्रेमाची गोष्ट (के. बी.)

बहुरूपी

बेबंदशाही (संभाजी)

मादी मित्र

मी जिंकलो मी हरलो (माधव)

मुख्यमंत्री (मुख्यमंत्री)

यशोदा (अण्णा खोत)

राजमुकुट (राजेश्वर)

राव जगदेव मार्तंड (जगदेव)

लग्नाची बेडी (कांचन)

वंदे मातरम (त्रिभुवन)

वेड्याचं घर उन्हात (दादासाहेब)

शतखंड (प्रा. धुंडिराज धांदेफळकर)

सुंदर मी होणार (डॉ. पटवर्धन)

सूर्य पाहिलेला माणूस (सॉक्रेटीस)

हिमालयाची सावली (गुंडो गणेश)

क्षितिजापर्यंत समुद्र