ज्येष्ठ निर्माते, सिनेमॅटोग्राफर प्रेम सागर काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ निर्माते, सिनेमॅटोग्राफर प्रेम सागर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर ब्रीच पँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, दुपारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टीव्हीवर गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांचे ते सुपुत्र होत. पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) 1968च्या बॅचचे ते विद्यार्थी होते. येथील प्रशिक्षणाने त्यांच्या करिअरला नवी दिशा दिली. त्यांना पह्टोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीचे भक्कम तांत्रिक ज्ञान मिळाले. आपले वडील आणि प्रख्यात दिग्दर्शक रामानंद सागर यांनी स्थापन केलेल्या सागर आर्ट्स या प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्यांनी काम केले.

दूरदर्शनवरील ‘अलिफ लैला’ या मालिकेचे प्रेम सागर हे दिग्दर्शक होते. निर्माते म्हणून त्यांनी हम तेरे आशिक हैं (1979), बसेरा (2009) आणि जय जय शिव शंकर (2010) असेही प्रकल्प साकारले. ऑंखे (1968) आणि ललकार (1972) या चित्रपटांत त्यांनी पॅमेरा आणि इलेक्ट्रिकल विभागात काम केले, तर चरस (1976) या चित्रपटात ते सिनेमॅटोग्राफर होते. अलिकडेच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये त्यांनी आपल्या वडिलांवर लिहिलेल्या ‘अॅन एपिक लाइफ ऑफ रामानंद सागर ः फ्रॉम बरसात टू रामायण’ या पुस्तकाचे अनावरण केले होते.