ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या पुरोगामी विचार चळवळीतील धडाडीच्या कार्यकर्त्या, ‘मिळून साऱ्याजणी’ या महिलांविषयक नियतकालिकाच्या संपादिका, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

12 जानेवारी 1937 रोजी विद्या बाळ यांचा जन्म झाला. 1958 साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. विद्या बाळ यांनी महिलांविषयक भरीव लेखन करून लेखिका आणि संपादक म्हणूनही महत्त्वपूर्ण काम केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून नोकरी केली. 1964 ते 1983 या दरम्यान त्यांनी ‘स्त्री’ या मासिकाच्या सहाय्यक संपादक म्हणूनही काम पाहिले.

विद्या बाळ यांनी 1989 मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरू केले. या मासिकाद्वारे स्त्रियांचे विश्व उलगडत त्यांनी महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत समाजप्रबोधन केले. स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी विद्या बाळ यांनी ‘नारी समता मंच’ ही संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी ‘मी एक मंजुश्री’ प्रदर्शन भरवले होते. महिलांना बोलण्यासाठी हक्काची जागा मिळवून देण्यासाठी विद्या बाळ यांनी ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. या कार्याला पुरुषांची साथ मिळावी यासाठी त्यांनी 2008 साली ‘पुरुष संवाद केंद्र’ही सुरू केले होते.

नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी अत्याचारग्रस्त महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना त्यांना बोलते करायचे काम केले. ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या माध्यमातून स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांचे हक्क यासाठी सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांच्या निधनाने नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला आहे.
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अग्रणी नेतृत्व काळाच्या पडद्याआड
स्त्री हक्क चळवळीतील अग्रणी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. राज्यातील महिलांना संघटित, हक्काविषयी जागरूक, सक्षम करणे हीच विद्याताईंना श्रद्धांजली ठरणार आहे.
– उपमुख्यमंत्री अजित पवार

विद्या बाळ या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचार चळवळीतील खंद्या कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या निधनाने देशातील पुरोगामी विचार चळवळीची मोठी हानी झाली आहे.
– श्रीपाद जोशी, अ.भा.म.सा. महामंडळाचे माजी अध्यक्ष

महिलांसाठी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विद्या बाळ यांनी केलेले काम कायम अविस्मरणीय राहील. त्यांच्या निधनाने एक मोठा आधार निखळलेला आहे.
– डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती विधान परिषद