
विद्यार्थ्यांना कोणताही मानसिक त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेऊन सहज व सोप्या पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा व कधी घेता येईल याचा अभ्यास करण्यासाठी कुलुगुरूंची समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. ही समिती उद्या सकाळी अहवाल सादर करील. त्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परीक्षेचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल असे ते म्हणाले.
अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात झूमच्या माध्यमातून तेरा अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूंसोबत मंत्रालयात ऑनलाइन बैठक झाली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन विद्यापीठानी एका समान पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील याची आखणी करावी तसेच यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे शक्य आहे का? याचाही विचार करावा अशी सूचना उदय सामंत यांनी केली.
- परीक्षा कशा आयोजित करण्यात येतील त्याचा अभ्यास करण्यासाठी कुलुगुरूंची समिती स्थापन करण्यात आली.
- यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून परीक्षा कधी व कशा घेता येतील याचा अहवाल उद्या रविवारी सकाळी 11 वाजता अहवाल समिती सादर करेल.
- गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश, बनारस विद्यापीठांनी कशा पद्धतीने परीक्षा घेतल्या आहेत याचाही सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला.




























































