कुलगुरू निवडीचे अधिकार पुन्हा राज्यपालांकडे; मविआ सरकारचा निर्णय बदलला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mantralaya-5

राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू निवडीचे अधिकार आता पुन्हा एकदा राज्यपालांच्या कक्षेत आणण्याचा निर्णय या नव्या सरकारने आज घेतला. या निर्णयाबरोबरच उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांना विद्यापीठांचे प्रकुलपती होण्याचे महाविकास आघाडी सरकारने दिलेले अधिकारही मागे घेतले आहेत. अशा प्रकारे महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणखीन एक निर्णय नव्या सरकारने बदलला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 सुधारणा विधेयक क्र. 35 (तिसरी सुधारणा) 2021 मागे घेण्यात आली आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये कुलगुरू निवडीचे राज्यपालांना असलेल्या अधिकारात बदल करीत महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात बदल केला होता, पण नव्या सरकारने हा निर्णय बदलला आहे.

विद्यापीठातील कुलगुरू निवडीच्या अधिकारासोबतच राज्यातील अभिमत विद्यापीठांमधील प्रवेश तसेच शुल्काचे विनियमन करण्यासाठी पेंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले विधेयक मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम सुधारणाचे विधेयक मागे घेण्यात येईल व दुरुस्तीसह पुन्हा लागू करण्यात येईल. केंद्र शासनाच्या प्राधिकरणांकडून घेण्यात येणाऱया प्रवेश प्रक्रियेच्या आधारे अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश बंधनकारक करण्यात आलेले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांकरिताचे प्रवेशदेखील संबंधित शिखर संस्थांकडून विनियमित होतात. ही बाब लक्षात घेता हे विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे.