विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! सरकारचे एक पाऊल मागे, पोलीस भरतीसाठी वाढवली वयोमर्यादा

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्यात यावी यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. यातच आता राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा शासन निर्णय 10 सप्टेंबर 2025 रोजी गृह विभागाकडून जारी  करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य पोलीस दलातील शिपायांची सुमारे  15,631 पदे भरण्यात येणार आहे. यात 2022 पासून ते 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी देण्यात येत आहे. यात ज्या विद्यार्थ्यांची संधी वयोमर्यादामुळे हुकली होती त्यांना या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

पोलीस भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे की, “महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी एकूण 15,631 पदे भरतीसाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.” यात पुढे सांगण्यात आले की, “शासनाच्या नव्या शुद्धपत्रकानुसार, सन 2022, 2023, 2024 व 2025 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.”