अखेर रसवंती आंदोलनाला यश; ‘जय महेश’चे प्रशासन नमले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

ऊस बिलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना पवारवाडी (जि.बीड) आणि सावरगाव, तेलगाव येथील कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ‘रसवंती आंदोलना’ला मोठे यश आले आहे.

साखर आयुक्त आणि जय महेश कारखान्याचे जनरल मॅनेजर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बीले आजपासून जमा होणार आहेत. येत्या ३१ जानेवारी पर्यंत १५ डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाची बीले थकित रक्कम देण्यात येणार असल्याची लेखी हमी जय महेश कारखान्याने सोमवार रोजी दिली.

शिवसेनेच्या प्रवक्ता तथा आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक ज्ञानदेव मुकणे, मंगेश तिटकारे यांच्याशी सविस्तर चर्चा करुन योग्य शिष्टाई केली आणि पिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. शिवसेना माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गेली सात दिवस चालले. त्यामुळे या आंदोलनाला १०० टक्के य़श मिळाले असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

सोमवारी पिडीत शेतकरी, शिवसेना पदाधिकारी व साखर आयुक्त यांच्यात समाधानकारक चर्चा होवून योग्य तोडगा निघाला.