फेमस होण्यासाठी काय पण! रिल्सच्या वेडापायी रेल्वेतील प्रवाशांवर हल्ला

आजकाल लोक फेमस होण्यासाठी काहीही करायला मागेपुढे पाहात नाहीत. खासकरुन सध्याच्या घडीला रिल्स करण्याच्या नादात माणसाने त्याची सदसद्विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे. रिल्स काढायचे आणि ते सोशल मीडियावर टाकायचे. फेमस व्हायच्या या नादात मात्र हे रिलप्रेमी अनेकदा गोत्यात येतात. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली.

भोजपूर जिल्ह्यातील नागरी हॉल्ट येथे दोन तरुणांनी रील्स बनवण्याच्या नादात चालत्या रेल्वेतील लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आता रेल्वे सुरक्षा दलाने (RPF)) या प्रकरणात तातडीने कारवाई करून आरोपी तरुणांना अटक केली आहे.

बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील नागरी हॉल्टजवळ चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांवर हल्ला झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दोन तरुण प्रवाशांना काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. दरम्यान हा हल्ला कोणत्याही शत्रुत्वाच्या किंवा दरोड्याच्या उद्देशाने करण्यात आला नव्हता, तर सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी रील शूट करण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या तपासातून समोर आले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांबाबत चिंता व्यक्त केली आहे. या धोकादायक आणि बेजबाबदार कृत्यानंतर आरपीएफने तात्काळ कारवाई करत दोन्ही तरुणांना अटक केली. मात्र त्यांची ओळख अद्याप उघड केलेली नाही. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला असून इतर संभाव्य आरोपींचा शोध सुरू आहे.