
चीनमध्ये सध्या ‘कोरोना व्हायरस’ने थैमान घातलं आहे. 650 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आला आहे. हा आकडा याहून अधिक मोठा असल्याचे बोलले जात आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 20 हजारापर्यंत असल्याचे सांगितले जाते. चीनवर आजपर्यंतचं हे सर्वात मोठं संकट मानलं जात आहे.
कोरोनामुळे जगाला धडकी भरवणाऱ्या चीनची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. अत्यावश्यक असल्यासच लोक घराबाहेर पडत आहेत. बीबीसी वृत्तसमूहाने यासंदर्भातील एक व्हिडीओ जारी केला आहे. चीनमधील कायम चर्चेत राहणारं शांघाय शहर, ज्यामध्ये कायम वर्दळ असते तिथे कर्फ्युसारखं वातावरण आहे. रस्त्यांवर एखादी व्यक्ती दिसते. रस्त्यांप्रमाणेच मेट्रो, बाजारपेठांमध्येही असेच वातावरण आहेत. लोकांनी सुट्टी घेऊन घरी बसणं किंवा घरून काम करणं पसंत केलं आहे.
एखाद्या इमारतीत, हॉटेलमध्ये किंवा सरकारी ठिकाणी प्रवेश करण्यासाठी शरीराचे तापमान मोजले जाते. तपासणी आणि चौकशीनंतरच तुम्ही इमारतीत प्रवेश करू शकतात, असे या व्हिडीओतून दाखवण्यात आले आहे.
चीनला प्रचंड मोठा फटका बसला असून ही परिस्थिती महिनाभर अशीच राहण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. या संकाटामुळे चीनवर आर्थिक संकटही दाट झाले आहे.




























































