Video – पुण्यात माणुसकीला काळिमा, आर्थिक वादातून तरुणाची काढली नग्न धिंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांस्कृतिक ओळख अशी बिरुदे मिरवणाऱ्या पुणे शहरात माणुसकीला काळिमा फासण्याची घटना घडली आहे. आर्थिंक वादातून एका टोळक्याने तरुणाची भर रस्त्यावरुन नग्न धिंड काढल्याची घटना कोंढव्यात घडली आहे. त्यानंतर तरुणाला मारहाण करुन सिगारेटचे चटकेही देण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये माणुसकी शिल्लक राहिली आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण दुचाकी मॅकेनिक असून त्याचे गॅरेज आहे. काही दिवसांपूर्वी ओळखीतील तरुणाने त्यांच्या गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्त करण्यासाठी टाकली होती. दुचाकी दुरुस्तीनंतर बिलावरुन मॅकेनिक आणि तरुणामध्ये वादावादी झाली. त्यानंतर संबंधित तरुणाने मित्रांना बोलावून मॅकेनिक तरुणाला नग्न करुन परिसरातून धिंड काढली. त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

दरम्यान, या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. ही घटना 17 नोव्हेंबरला सायंकाळी घडली होती.