
सातपूर येथे सोमवारी रात्री ‘आप’च्या एका उमेदवारावर पिस्तूल रोखल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. संबंधित कार्यकर्ता हा एका टोळीशी संबंधित आहे. या भागात प्रचार करू नये म्हणून दमदाटी होत असल्याने खळबळ उडाली आहे.
आम आदमी पार्टीकडून समाधान रमेश अहिरे सातपूरच्या प्रभाग 11मध्ये निवडणूक लढवत आहेत. ते सोमवारी रात्री प्रचार आटोपून नातेवाईकाकडील वाढदिवसानिमित्त प्रबुद्धनगर भागात आले, तेव्हा सार्थक सचिन गोवर्धने व त्यांच्यात बाचाबाची झाली. सार्थकने आपल्यावर पिस्तूल रोखले, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, यावेळी दोन्ही गटांत हाणामारी झाली. सातपूर पोलीस ठाण्यात अहिरे यांच्या फिर्यादीवरून सार्थक गोवर्धने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी तपास केला असता ते पिस्तूल बनावट असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती सातपूर पोलिसांनी दिली आहे.
शिष्टमंडळाने घेतली उपायुक्तांची भेट
आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची आज भेट घेऊन समाधान अहिरे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याची माहिती दिली. पिस्तूल रोखून हाणामारी करणारे कार्यकर्ते अपक्ष उमेदवार प्रकाश लोंढे यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्यातील धोका टाळण्यासाठी उपाययोजना करा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
























































