Video – संगमेश्वरात आराम बस जळून खाक

1034

मुंबई – गोवा महामार्गावर संगमेश्वर पारेख पेट्रोलपंप येथे एक आराम बस पूर्णतः जळून खाक झाली. मागील टायरने पेट घेतल्याने हा गंभीर प्रसंग ओढवल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने सर्व प्रवासी आराम बस मधून सुरक्षितपणे बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार आज सकाळी सात वाजून दहा मिनीटांनी घडला. यामध्ये आराम बस पूर्णत: जळून खाक झाली असून प्रवाशांचे सर्व सामानही जळून गेल्याने सुमारे तीस लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

विरारहून देवगडला जाणारी साई श्रृती कंपनीची आराम बस क्रमांक एम एच 04 एच वाय 6010 घेऊन चालक धावू नानू बोडके ( 35 रा . विरार ) हा काल रात्री विरारहून 22 प्रवाशांना घेऊन देवगड येथे जाण्यासाठी निघाला . काल कशेडी घाटात दरड कोसळली असल्याने आराम बस दोन तासांपेक्षा अधिक काळ कशेडीतच रखडली होती .

साई श्रृती कंपनीची ही बस धामणी संगमेश्वर येथे येताच बसच्या मागील चाकाला आग लागली. अशा स्थितीतच बस पुढे धावत असल्याने आग अधिक भडकत गेली. मागून येणाऱ्या एका इनोव्हा चालकाने बसला आग लागल्याचे सांगताच आपण बस थांबवली अशी माहिती बस चालक धावू बोडके याने दिली. तातडीने बस मधील सर्व 22 प्रवाशांना बस मधून खाली उतरवून सुरक्षित ठिकाणी उभे करण्यात आले.

दरम्यान बस वेगाने पेटू लागताच मापारी मोहल्ला, रामपेठ येथील तरुणांनी तातडीने पाण्याची व्यवस्था केली मात्र आग प्रचंड मोठी असल्याने बस प्रवाशांच्या सामानासह जळून खाक झाली . संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे, ए एस आय विभुते, हे. कॉ. कोष्टी, कॉ. कामेरकर आदि घटनास्थळी दाखल झाले. रत्नागिरी येथून फायर ब्रीगेडलाही पाचारण करण्यात आले. मात्र प्रवाशांच्या सर्व सामानासह बस जळून खाक झाली. यामध्ये 30 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्यान यामध्ये प्रवाशांचे काही मौल्यवान सामान असल्याने नुकसानाचा आकडा वाढूही शकतो. प्रवाशांनी मात्र या आगीबाबत वेगळा सूर लावल्याचे घटानास्थळी ऐकायला मिळत होते.

आपली प्रतिक्रिया द्या