विधान भवन कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये डय़ुटी, एका शिफ्टमध्ये काम करणार 50 टक्के कर्मचारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या वेळेचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार विधिमंडळातही कर्मचाऱ्यांची एकावेळी 50 टक्के उपस्थिती राहील याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे विधिमंडळात कोरोना काळात दोन शिफ्टमध्ये काम केले जाणार असून यासंदर्भातील परिपत्रक काढण्यात आले आहे.

विधिमंडळ सचिवालयात साधारण 900 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये 50 टक्के क्षमतेने काम करण्याचे निर्देश विधिमंडळ अवर सचिवांच्या मार्फत देण्यात आले आहेत. पहिले सत्र सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत तर दुसरे सत्र दुपारी 1 ते सायंकाळी  7 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या नुसार कर्मचाऱ्यांना दोन सत्रात विभागण्यात येणार आहे.

मंत्रालयातही चाचपणी

कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी दोन शिफ्टमध्ये काम करता येईल का, याबाबत मंत्रालयातही चाचपणी करण्यात येत आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची संख्येनुसार विभागणी आणि कामांच्या तासांबाबत सामान्य प्रशासन विभागाला अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे. मंत्रालयातील कामाचा आवाका हा मोठय़ा प्रमाणात असल्याने या  ठिकाणी हे करणे शक्य होईल का, याचीही चाचपणी करण्यात येत आहे.