विधान परिषदेवर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vidhanbhavan

पुढील पाच महिन्यांत विधान परिषदेच्या 24 जागा रिक्त होत असून विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात जाण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी किंवा राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागावी म्हणून इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.

विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून गेलेल्या 9 सदस्यांची मुदत येत्या 24 एप्रिल रोजी संपत आहे. त्यात काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या प्रत्येकी तीन तर शिवसेनेच्या एका जागेचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले किंवा उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पक्ष नेतृत्वाच्या भेटीगाठी घेऊन विधान परिषदेवर वर्णी लावण्यासाठी साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यामुळे विधान परिषद निवडणुकीची गणिते बदलली आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याने या निवडणुकीत भाजपला मित्रपक्ष आणि अपक्षांच्या सहाय्याने किल्ला लढवावा लागेल. विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने निवडणूक झाल्यास मतांसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जून महिन्यात 12 राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची मुदत संपत आहे. विधान परिषदेवर कला, साहित्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील व्यक्ती राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नेमण्याची तरतूद आहे, मात्र 1999 पासून राजकीय व्यक्तींची सोय लावण्याचा पायंडा पडला आहे. तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारासंघांसाठी जून-जुलै महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे.

निवृत्त होणारे सदस्य – विधानसभा सदस्यांद्वारे निवडून गेलेले
काँग्रेस – चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड
राष्ट्रवादी – हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर.
भाजप – पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ, अरुण अडसड.
शिवसेना – डॉ. नीलम गोऱ्हे.

राज्यपाल नामनियुक्त सदस्य
काँग्रेस – हुस्नबानू खलिफे, अनंत गाडगीळ, जनार्दन चांदूरकर, आनंदराव पाटील, रामहरी रूपनवर.
राष्ट्रवादी काँग्रेस – प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे.
पीआरपी – जोगेंद्र कवाडे (राहुल नार्वेकर, रामराव वडकुते यांनी राज्यपाल नामनियुक्त सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.)
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ-
सतीश चव्हाण (संभाजीनगर), अनिल सोले (नागपूर)
(चंद्रकांत पाटील विधानसभेवर गेल्याने पुणे पदवीधरची जागा रिक्त आहे.), श्रीकांत देशपांडे (अमरावती), दत्तात्रय सावंत (पुणे)