विदर्भाने इराणी करंडकही राखला;पहिल्या डावातील आघाडीवर जेतेपदावर शिक्कामोर्तब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सलग दुसऱ्या वर्षी इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद राखण्यात यश मिळवले. शेष हिंदुस्थानकडून मिळालेल्या 280 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाने पाचव्या व निर्णायक दिवशी 103.1 षटकांत 269 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. विजयासाठी अवघ्या 11 धावांची गरज असताना गणेश सतीश बाद झाल्यानंतर उभय संघांच्या कर्णधारांनी एकमताने सामना थांबविण्याचा निर्णय घेतला आणि विदर्भाने इराणी करंडकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. पहिल्या डावात शतकी खेळी करून आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा अक्षय कर्णेवार सामन्याचा मानकरी ठरला.

शेष हिंदुस्थानने विदर्भापुढे विजयासाठी 280 धावांचे लक्ष्य ठेवले होते. विदर्भाने 1 बाद 37 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. संजय रघुनाथन (42) व अथर्व तायडे (72) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी 116 धावांची भागीदारी केली. त्यानंतर गणेश सतिश (87) व मोहित काळे (37) यांनी शेष हिंदुस्थानच्या गोलंदाजांचा चिवटपणे प्रतिकार केला.