
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना विदर्भाचा युवा वेगवान गोलंदाज श्रीकांत वाघ याने इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये एकाच डावात प्रतिस्पर्धी संघाच्या सर्व १० फलंदाजांना बाद करण्याचा भीमपराक्रम केलाय. शिवाय त्याने हा पराक्रम इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मिडेलब्रो या तगड्या संघाविरुद्ध नोंदवलाय. श्रीकांतने ११.४ षटकांत ३९ धावांच्या मोबदल्यात मिडेलब्रोच्या १० फलंदाजांना तंबूत परतवून लावण्याची किमया केली.
श्रीकांत लीगमधील स्टोक्सले संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. श्रीकांतने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही २८ चेंडूंत ४१ धावा फाटकावल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर स्टोक्सले संघाने इंग्लिश प्रीमियर डिव्हिजन लीग क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य मिडेलब्रो संघावर १३५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
स्टोक्सले क्लबने आपल्या ट्विटर हँडलवर श्रीकांतच्या पराक्रमाचे दर्शन घडवणारा लीग सामन्याचा पूर्ण धावफलक टाकला आहे. या विजयाने स्टोक्सले क्लबला विक्रमी २५ गुणांची कमाई करता आलीय. श्रीकांत हा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी असून ग्रामीण भागातून येत त्याने ही मोठी झेप घेतली आहे.
यापूर्वीही घेतल्या होत्या ९ विकेट्स
२००३-०४ च्या अंडर १९ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीकांतने बांगलादेशविरुद्ध एकाच डावात ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी १० विकेट्सचा पराक्रम करण्यापासून डावखुरा वेगवान गोलंदाज श्रीकांत वंचित राहिला होता. त्याची ती इच्छा आता पूर्ण झाली आहे.



























































