विदित गुजराथीला हवेय आर्थिक बळ; जागतिक स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी राज्य सरकारकडे मदतीचे साकडे

हिंदुस्थानचा तिसऱया क्रमांकाचा बुद्धिबळपटू ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथी हा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आव्हानवीर निश्चित केल्या जाणाऱया कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तो महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडू आहे. स्पर्धेपूर्वीचे प्रशिक्षण आणि सरावासाठी राज्य सरकारकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा विदितने व्यक्त केली आहे.

आव्हानवीर स्पर्धेसाठी पात्र ठरणे सोपे नाही. या स्पर्धेच्या निमित्ताने किमान महिनाभर स्पर्धा होत असलेल्या कॅनडामध्ये किमान एक महिना राहावे लागणार आहे. इतके दिवस कॅनडामध्ये राहाणे, फार खर्चिक बाब आहे. हेच माझ्यासमोर असलेले मोठे आव्हान असल्याचे विदितने सांगितले. स्पर्धेदरम्यान माझे सहाय्यकही माझ्या सोबत असतील. कारकीर्दीच्या सुरुवातीपासून भारत फोर्ज आणि लक्ष्य स्पोर्ट्स यांचा मला पाठिंबा लाभला आहे, परंतु ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळावे, असे मला वाटते. राज्य सरकारच्या मुख्यमंत्रांनी तसेच क्रीडा खात्याने याप्रकरणी लक्ष घालावे, असे आवाहन विदितने प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

जागतिक विजेता चीनचा डिंग लिरेनचा आव्हानवीर ठरविण्यासाठी होणारी कँडिडेट्स स्पर्धा 2 ते 25 एप्रिल 2024 दरम्यान कॅनडातील टोरँटो येथे होईल. या स्पर्धेत आठच बुद्धिबळपटू खेळणार असून यात तिघे हिंदुस्थानचे आहेत. विदितसह हिंदुस्थानचा अव्वल मानांकित डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद हे अन्य खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्राच्या विदितने आयल ऑफ मॅन येथे झालेल्या फिडे ग्रॅण्ड स्विस 2023 स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर तो या प्रतिष्ठाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. विशेष म्हणजे आयल ऑफ मॅन येथील स्पर्धा जिंकणारा तो हिंदुस्थानचा पहिला खेळाडू ठरला.

विदितला लाभेल का राज्य सरकारचे बळ
कँडिडेट्स स्पर्धेत खेळण्यासाठी तामीळनाडू सरकारने बुद्धिबळपटू गुकेश आणि प्रज्ञानंद यांना पूर्ण सहकार्य केले असून त्यांना आवश्यक ती सर्व आर्थिक मदत त्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ते दोघे पात्र ठरल्याबरोबरच तामीळनाडू सरकार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिलीय, पण विदितच्या पराक्रमाकडे राज्य सरकारचे अद्याप लक्ष वेधले गेलेले नाही. त्यामुळे त्याने स्वतःच पुढाकार घेत आगामी स्पर्धेसाठी राज्य सरकारकडे मदतीसाठी साकडे घातले आहे. सध्या विदितला लक्ष्य स्पोर्ट्स आणि भारत फोर्ज यांचे पाठबळ लाभले आहे.